मुंबई : बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांना उच्च न्यायालयाने कथित बलात्कार प्रकरणात अटकेपासून नुकतेच अंतरिम संरक्षण दिले. तथापि, येत्या १६ व १७ एप्रिल रोजी पृथ्वीराज यांनी तपास यंत्रणेसमोर उपस्थित राहून तपासात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने त्यांना दिलासा देताना स्पष्ट केले.

पृथ्वीराज पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना पीडितेची बाजू ऐकणेही आवश्यक आहे. त्यामुळे, पीडितेलाही याचिकेत प्रतिवादी करण्यात यावे, अशी मागणी पोलिसांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली. त्यासाठी वेळ देण्याची मागणी पृथ्वीराज यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली. ती न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने मान्य केली व त्यांना सुधारित याचिका करण्याचे आदेश दिले.

…तर अटकेपासून दिलेले संरक्षण रद्द होईल

याचिकेत पीडितेला प्रतिवादी न केल्यास न्यायालयाच्या परवानगीविना त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने पृथ्वीराज यांना बजावले. तपास यंत्रणेमार्फत पीडितेला नोटीस बजावली जाईल. तसेच, १६ व १७ एप्रिल रोजी तपास यंत्रणेसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेशही न्यायालयाने पृथ्वीराज यांना देऊन प्रकरणाची सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली.

प्रकरण काय ?

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन २९ वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पृथ्वीराज यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, पीडितेची एका मॉलमध्ये जानेवारी २०२३ मध्ये पृथ्वीराज यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर, त्यांचे मैत्रीत रुपातंर झाले आणि पुढे त्यांच्यात लौंगिक संबंध निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

आरोपांचे खंडन

पाटील यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तक्रारदार महिलेने यापूर्वीही प्रतिष्ठित व्यक्तींविरुद्ध अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या होत्या, असा दावाही पृथ्वीराज यांनी याचिकेत केला आहे. आपण कधीही ठाण्यात गेलो नाही .आपण विवाहित असून आपल्याला गुन्हेगारीची कोणताही पार्श्वभूमी नाही. तक्रारदार महिलेने आपल्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा दावाही पृथ्वीराज यांनी केला आहे.