आमदारकी नाकारल्याने असंतोष ;शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी त्यांना स्वत:ला केंद्रात मंत्रिपद मिळाले पाहिजे, यासाठी भाजपने राज्यात देऊ केलेली विधान परिषदेची आमदारकी नाकारल्याने पक्षात असंतोष पसरला आहे. आठवले यांचे खंदे समर्थक व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या उपस्थितीत शनिवारी ४ जून रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक होणार आहे. त्यात आठवले यांच्या आत्मकेंद्रित राजकारणालाच आव्हान दिले जाणार आहे. त्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप व रिपब्लिकन पक्षाची युती झाली होती. त्या वेळी राज्यात सत्तेवर आल्यानंतर सत्तावाटपाबाबत दोन्ही पक्षांत करार झाला होता. त्या करारावर विद्यामान मुख्यमंत्री व तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या सहय़ा आहेत. राज्यात सत्ता मिळाल्यास रिपाइंला केंद्रात मंत्रिपद, राज्यात पाच वर्षांत विधान परिषदेच्या दोन आमदारकी आणि दहा टक्क्यांच्या हिशेबाने मंत्रिपदे दिली जातील असे त्या करारात नमूद करण्यात आले आहे. भाजपने देऊ केलेली विधान परिषदेची एक आमदारकी घालवल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये अंसतोष आहे.
पक्षातूनच संताप
एक आमदारकी कुणाला द्यायची हा निर्णय आठवले यांना घ्यायचा अधिकार होता. परंतु आमदारकी घ्यायची नाही, या त्यांच्या भूमिकेला आता पक्षातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. या संदर्भात नागपूरमध्ये ४ जूनला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून, त्याला प्रदेशाध्यक्ष धुलकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे विदर्भ विभागीय महासचिव अशोक मेश्राम यांनी दिली.