मुंबई : दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्यातील वादामुळे गटबाजी सुरू आहे. याला कंटाळून विभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुखे गिरीश धानुरकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा >>> तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!
माहीम, धारावी, वडाळा या तीन विधानसभेचे प्रमुख गिरीश धानुरकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. सदा सरवणकर यांच्या शिफारशीमुळेच धानुरकर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून सदा सरवणकर व त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे आपल्याला पदाधिकाऱ्यांमार्फत मानसिक त्रास देत असल्याचे धानुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच सरवणकर यांना आपल्या मर्जीतला व्यक्ती हवा असून राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क न ठेवणारा विभागप्रमुख हवा असल्याचे धानुरकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. पक्षाची इतर कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.