रिपब्लिकन पक्षातील फाटाफुटीमुळे निवडणुकांमध्ये सातत्याने राजकीय पराभव पत्करावा लागत असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्यासाठीही सध्या राज्यभर गटागटानेच बैठका सुरू आहेत. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्य कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांची व अन्य आंबेडकरवादी राजकीय पक्षांची धूळधाण झाली. मुंबई महापालिका निवडणुकीत तर एकाही गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. गेल्या पंचवीस वर्षांत रिपब्लिकन पक्षावर अशी नामुष्की कधी ओढावली नव्हती. त्यामुळे सर्वच गटा-तटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. या पराभवाला अनेक कारणे असली, तरी पक्षातील गटबाजी हे एक प्रमुख कारण असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात पराभव टाळायचा असेल, तर एक पक्ष, एक नेता, एक झेंडा या संकल्पनेवर रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे, असे मानणारा एक कार्यकर्त्यांचा वर्ग आहे. मात्र रिपब्लिकन ऐक्याऐवजी विविध गटांचा, संघटनांचा समावेश असलेली रिपब्लिकन आघाडी तयारी करावी, अशी भूमिका काही नेत्यांची-कार्यकर्त्यांची आहे. रिपब्लिकन ऐक्य व्हावे, असे वाटणारे काही तरुण कार्यकर्ते मुंबईत आंबेडकरी समाजाचा प्रभाव असणाऱ्या वस्त्यांमध्ये चिंतन बैठका घेत आहेत. १६ एप्रिलला मुंबई विद्यापीठात विविध पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्या झालेल्या बैठकीत रिपब्लिकन आघाडीची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीत रिपब्लिकन ऐक्याचाच विचार मांडण्यात आला. त्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क साधून, त्यांची मते जाणून घेऊन ऐक्यासंबंधीचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. परंतु त्याबाबत पुढे काहीच हालचाल झाली नाही, असे या समितीचे एक सदस्य आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक  डॉ. पी.जी. जोगदंड यांनी सांगितले.

मुंबईत १० किंवा ११ जूनला बैठक

विदर्भातही अशाच प्रकारच्या बैठका घेऊन रिपब्लिकन राजकारणाची नव्याने मांडणी करण्यासाठी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे. या संदर्भात वर्धा येथे एक बैठक होणार आहे, अशी माहिती संयोजक अशोक मेश्राम यांनी दिली. रिपब्लिकन आघाडीची उभारणी आणि कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी मुंबईत येत्या १० किंवा ११ जूनला बैठक होणार आहे, त्यात जास्तीत-जास्त संघटनांना सामावून घेण्यात येणार आहे, असे एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट्स अ‍ॅंड टीचर्स असोसिएशनचे संजय वैराळ यांनी सांगितले.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internal dispute in republican party of india
Show comments