महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क विकसित करण्यात येणार आहे. परंतु, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या थीम पार्कबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला होता. तर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्ताच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त साधलेल्या संवादात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुंबई रेसकोर्सवर काय होणार? असा प्रश्न आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई रेसकोर्सवर मुंबईकरांसाठी एक खूप मोठं आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क बनवण्याचा सरकारचा मानस आहे. रेसकोर्सही कायम राहील. पण मुंबईत तुम्हाला कुठे एवढं मोठं गार्डन मिळणार? आम्ही त्यांच्याकडे १२० एकर जमीन मागितली आहे. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली २०० एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन अशा ३२० एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाईल. ते ऑक्सिजन हब असेल एकप्रकारे. मुंबई देशात नाही, जगात पहिल्या क्रमांकावर असायला हवी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे सेंट्रल पार्क लोकांसाठी वरदान असायला हवं.
“लालफितीमध्ये कामं अडकणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असतो. त्यामुळे एकल खिडकी योजना आपण चालू केली. मध्ये युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक घडामोडींचे परिणाम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अनेकांना भोगावे लागतात. पण या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून नियोजन केलं जातं. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी सोडला आहे. नीती आयोगाच्या लोकांनी मुंबई-एमएमआरमध्ये खूप क्षमता आहे असं सांगितलं. या भागातच १ ट्रिलियनचं लक्ष पूर्ण होऊ शकेल असं सांगितलं. त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात आधी पालिका आयुक्तांना बोलवलं. त्यांना सांगितलं की हे शहर खड्डेमुक्त झालं पाहिजे. काय अडचण आहे त्यात? आम्ही पहिला निर्णय घेतला तो म्हणजे रस्त्यांचं काँक्रिटीकरण. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्याचं काम मार्गी लागतंय. पुढच्या अडीच वर्षांत मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त पाहायला मिळेल. या प्रकल्पांमुळे एमएमआरचा मेकओव्हर होईल. आर्थिक विकासाचं एक नवीन केंद्र उदयाला येईल”, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं.