मुंबई: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाजवळ भिवंडी येथील आमणे गावानजिक लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येणार आहे. खेळासाठी राखीव असलेली आमणे येथील ५० एकर जागा क्रिकेट मैदानासाठी ६० वर्षे भाडेतत्त्वावर देण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा जारी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जागा घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) स्वारस्य दाखविल्याचे समजते. ही जागा एमसीएच्या ताब्यात गेली तर ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएसआरडीसीने मुंबई नागपूर ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर – शिर्डी ६०० किमीचा टप्पा सध्या सेवेत दाखल असून उर्वरित महामार्ग नव्या वर्षात सेवेत दाखल होईल. दरम्यान, या महामार्गालगत पेट्रोल पंप, हॉटेल, शौचालय यासह अन्य सुविधा एमएसआरडीसी विकसित करणार आहे. त्यानुसार ठाण्यात समृद्धी महामार्ग जिथून सुरू होतो त्या भिवंडीतील आमणे गावापासून काही अंतरावर, वडपेपासून ५ किमी अंतरावर राज्य सरकारच्या मालकीची आणि सध्या एमएसआरडीसीकडे असलेली ५० एकर जागा खेळासाठी राखीव आहे. ही जागा खेळासाठी, त्यातही क्रिकेटच्या मैदानासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयानुसार ही जागा ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याकरिता निविदा काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा… गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चितीला मुदतवाढ; १४ जानेवारीपर्यंत कागदपत्र सादर करता येणार

निविदेनुसार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. निविदेत कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित संस्थेचा अुनभव, त्यांचे किती खेडाळू राष्ट्रीय स्तरावर निवडले, सदस्य संख्या आदी विविध बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. निविदा सादर करण्यासाठी ५ जानेवारी ही अंतिम मुदत आहे.

‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. एमसीएने ही जागा मिळावी यासाठी एमएसआरडीसीकडे अर्ज केला आहे. मात्र निविदेशिवाय ही जागा देता येणार नाही. त्यामुळे त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशिक्षण केंद्रे…

मुंबईत दोन मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने आहेत. मात्र ठाण्यात अद्यापही असे मैदान वा सुसज्ज क्रिकेट प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे ठाणे आणि आसपासच्या मुलांना क्रिकेटचे योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी या मैदानाचा वापर प्रशिक्षण केंद्र म्हणूनही केला जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International cricket ground in thane soon tender for lease of 50 acres of land near samruddhi highway mumbai print news dvr
Show comments