International Space Station Video: अवघ्या काही क्षणांचा अवधी, पण त्यात संधी मिळाली एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्याची! पुणे-मुंबईकरांच्या वाट्याला रविवारी संध्याकाळी आलेली ही विलक्षण संधी अवकाशप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरली. कोणत्याही दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी आपल्या घराच्या गॅलरीतून थेट आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याचा योग रविवारी संध्याकाळी पुणे-मुंबईकरांसाठी जुळून आला. याच अवकाश स्थानकात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर सध्या वास्तव्यास आहेत. ‘लोकसत्ता’चे नियमित वाचक प्रसाद दीक्षित यांनी या विलक्षण घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी काय होती ही घटना?

रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अवकाशात पश्चिमेकडे एक चमचमणारी गोष्ट मोठ्या वेगाने जाताना पाहायला मिळाली. ही गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होतं! “या काळात हे स्थानक अर्थात ISS क्षितिजाच्या १० अंश वरून जात असेल आणि नुसत्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहायला मिळेल”, अशी माहिती आधीच मुंबईतील नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली होती. त्यानुसार अवकाशप्रेमींनी रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास या घटनेचे साक्षीदार होण्याचा आनंद लुटला.

कसं आहे हे अवकाश स्थानक?

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे पृथ्वीपासून साधारणपणे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीवरून सोडण्यात येणारे उपग्रह साधारणपणे पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर अंतरावर परिक्रमा करत असतात. पण अवकाश स्थानक अर्थात ISS हे तुलनेनं पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे दिवसाच्या वेगवेगळ्या भागात ते जगभरातल्या वेगवेगळ्या देशांवरून जात असतं. या स्थानकाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा वेग ७ किलोमीटर प्रतिसेकंद इतका असतो. त्यामुळे अवघ्या ९० ते १०० मिनिटांत ते पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतं. एका दिवसात साधारणपणे १६ प्रदक्षिणा हे स्थानक पृथ्वीभोवती करत असतं. साधारणपणे २ ते ३ फुटबॉल स्टेडियमइतका या स्थानकाचा आकार आहे. त्याचं वजन जवळपास ४०० टन इतकं आहे.

गेल्या महिन्यातही जुळून आला होता योग!

हे यान साधारणपणे पहाटे किंवा संध्याकाळी उशीराच्या वेळी अवकाशात दिसू शकतं. दिवसा सूर्याच्या प्रकाशात प्रकाशित झालेलं असल्यामुळे हे स्थानक अवकाशातून जाताना लगेच दिसून येत नाही. पण यावेळी ते संध्याकाळच्या वेळी जाणार होतं. त्याबाबत आधीच माहिती प्रसारित करण्यात आली होती. त्यानुसार अनेक खगोलप्रेमींनी हे स्थानक अवकाशातून जाताना पाहिलं.

“पहिल्यांदाच असं काही पाहिलं”

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ ‘लोकसत्ता’ला शेअर करणार प्रसाद दीक्षित यांनी आयुष्यात पहिल्यांदाच अशी कुठली घटना नुसत्या डोळ्यांनी अवकाशात घडताना पाहिली होती. “माझ्यासाठी हा फार विलक्षण अनुभव होता. मला वाटलं नव्हतं एवढं स्पष्टपणे मला दिसेल. पण सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मी राहतो तिथे समोर बांधकाम चालू आहे. त्यामुळे ते एवढं स्पष्ट दिसेल याची मला खात्री नव्हती. पण ते सगळं शक्य झालं”, अशी प्रतिक्रिया प्रसाद दीक्षित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना दिली.