मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंडतर्फे (सीएसबीएफ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धर्म वीर मीना यांनी मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्षा आशा मीना यांच्या उपस्थितीत तंत्रज्ञ, अभियंते, कार्यालयीन अधीक्षक, रेल्वे व्यवस्थापक, सहाय्यक लोको पायलट, नर्सिंग अधीक्षक, अनुवादक आणि कार्यालयीन सहाय्यकांसह विविध विभाग आणि विभागांमधील २४ यशस्वी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आणि त्यांना ‘सशक्त नारी पुरस्कार’ प्रदान केला. याशिवाय, महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १० पत्नी / मुलींना शिलाई यंत्र भेट देण्यात आले. १३ मुलींना सायकल भेट देण्यात आली.
भारतीय संस्कृती आणि परंपरेत महिलांबद्दल खूप आदराचे स्थान आहे. मध्य रेल्वेमध्ये महिला अधिकारी पदापासून रेल्वे मार्ग मेंटेनर्सपर्यंत सर्व स्तरांवर काम करतात. भारतीय रेल्वेमध्ये पहिले महिला व्यवस्थापित स्थानक माटुंगा येथे असून त्यानंतर अजनी आणि अमरावती या स्थानकांचा क्रमांक लागतो. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव या मध्य रेल्वेचा अभिमान आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफ निरीक्षक रेखा मिश्रा यांनी सुमारे २ हजार हरवलेल्या आणि पळून गेलेल्या मुलांना वाचवले असून त्यांना महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सन्मानित केले आहे. मध्य रेल्वे महिला विशेष गाड्या देखील चालवते. संघटना आणि देशाच्या विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत आवश्यक आहे, असे धर्म वीर मीना म्हणाले.
भायखळा येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णायलाच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुषमा माटे या कार्यक्रमात अतिथी वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि सीएसबीएफचे अध्यक्ष सहर्ष बाजपेयी, अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान विभाग प्रमुख, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, सीआरडब्ल्यूडब्ल्यूओचे अधिकारी आणि मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.