भारतातील प्राचीन कलांपैकी एक असलेल्या योगाला भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग करण्यासाठी ‘जागतिक योगा दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाच्या तयारीत जुंपलेल्या भारतीयांनी योगा साहित्याच्या खरेदीसही सुरवात केली आहे. या सामनाच्या खरेदीत दिल्लीकर आघाडीवर असून मुंबईकरांचा तिसरा क्रमांक लागतो.
योगाचे महत्त्व जाणून त्याला एक व्यायामप्रकार म्हणून आपल्या जीवनशैलीचा भाग करण्यापेक्षा रविवारी आयोजित ‘योगा दिन’ ‘इव्हेंट’प्रमाणे दणक्यात साजरा करण्याकडे सध्या अनेकजण उत्सुक आहेत. त्यासाठी दुकानांमधून महागडी योगासाधने विकत घेतली जात आहेत. यामध्ये योगा मॅट्सचा पहिला क्रमांक लागतो. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात मुंबईत योगा मॅटच्या मागणीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर योगा डीव्हीडी, योगा सुट्स, पुस्तके यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमधील खेळाच्या साहित्याच्या मागणीमध्ये कमी होती. पण रविवारच्या योगा दिनाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा योगा साहित्याची मागणी वाढल्याचे मुंबईच्या ‘देव स्पोर्ट्स’चे विपुल गडा यांनी सांगितले. ‘पंधरा दिवसात योगा मॅट्सना सर्वाधीक मागणी आहे. तसेच मुलींसाठी योगा सुट्स आणि पुरुषांसाठी ट्रॅक पॅण्ट्सची मागणी वाढली आहे,’ असे त्यांनी सांगितले. एरवी महिन्याभरात मुश्किलीने संपणारे ३० मॅट्स या आठवडय़ात सहज संपले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अॅमेझॉन डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार या साहित्याची मागणी दिल्लीत सर्वाधीक असून त्यानंतर बंगळूर, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, पुणे, गोवा या शहरांचा क्रमांक लागतो. योगा साहित्याच्या मागणीत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये ३५ टक्के दिल्लीकरांचा समावेश आहे, तर २४ टक्के ग्राहक बंगळूरचे आहेत. मुंबईतून १६ टक्के ग्राहक नोंदविले गेले आहेत. महिन्याभरात भारतभरातून १,००० मॅट्सची मागणी नोंदवली गेली आहे. डीव्हीडीच्या मागणीतही ५५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून त्यात अभिनेत्री लारा दत्त आणि शिल्पा शेट्टी यांच्या डीव्हीडीना सर्वाधीक मागणी आहे.
योगासंदर्भातील पुस्तकांच्या मागणीतही या महिन्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
योग’ साहित्य खरेदीत मुंबईचा देशात तिसरा क्रमांक
भारतातील प्राचीन कलांपैकी एक असलेल्या योगाला भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग करण्यासाठी ‘जागतिक योगा दिना’चे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा
First published on: 21-06-2015 at 12:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day 01