योग, ध्यानधारणा आणि आयुर्वेदिक औषधोपचार यासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी नित्यनेमाने हजेरी लावणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पसरलेल्या विविध योग केंद्रांपर्यंत या परदेशी पर्यटकांना पोहोचविण्याबरोबरच तेथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी खास पॅकेजेस जवळपास सर्वच ट्रॅव्हल कंपन्या उपलब्ध करून देतात. मात्र, ‘जागतिक योग दिना’मुळे आपल्याकडे ‘योगपर्यटन’ क्षेत्राला नवी बळकटी मिळेल, असा विश्वास ‘ट्रॅव्हल कंपन्यां’कडून व्यक्त होतो आहे.
योगाकडे शास्त्र म्हणून पाहण्याचा आणि त्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी करून घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. २१ जून हा ‘जागितक योग दिन’ म्हणून जाहीर झाल्याचा सर्वाधिक फायदा भारतीय पर्यटन उद्योगाला होणार आहे, असे प्रतिपादन ‘कॉक्स अॅण्ड किंग’चे संपर्क प्रमुख करण आनंद यांनी केले. योगपर्यटनासाठी भारत एकमेव महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याचा दावा येत्या काळात आपण करू शकतो, असे आनंद यांनी सांगितले. योग आणि ध्यानधारणेसाठी फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि अमेरिकेतून अनेक पर्यटक भारतातील विविध ठिकाणची योग केंद्रे, आश्रमांना भेट देतात. खास योगासाठी हिमाचल प्रदेशातील धरमशाला, केरळातील थेक्काडी, उत्तराखंडातील हृषीकेश, गोव्यातील अगोंदा, कर्नाटकातील गोकर्ण, पॉण्डिचेरी, तामिळनाडूतील शिवाचे वास्तव्य असलेला प्रदेश म्हणून ओळखले जाणारे थिरूवन्नमलाई आणि कोईम्बतूर येथील वेलियनगिरी पर्वत या ठिकाणी भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या जास्त असल्याची माहिती ‘हॉलिडे आयक्यू’ या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने दिली. त्यातही हृषीकेशला भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तेथे योग, ध्यानधारणेसाठी येणाऱ्या पर्यटकांना खास पॅकेजेस ट्रॅव्हल कंपन्या उपलब्ध करून देतात. मात्र, ‘जागितक योग दिन’ साजरा होत असेल तर इथेही योगाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि देशांतर्गत ‘योग टूरिझम’ला प्रतिसाद वाढेल, अशी खात्री टूर ऑपरेटर्सनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत योग केंद्रांच्या माध्यमातून येणाऱ्या परदेशी आणि देशी पर्यटकांमुळे ‘योग टूरिझम’चा विकास निश्चित एका वेगाने होतो आहे, अशी माहिती करण आनंद यांनी दिली. एकूण पर्यटन व्यवसायामध्ये केवळ योग टूरिझमची दरवर्षी वीस टक्क्यांनी वाढ होत आहे. ‘जागतिक योग दिना’नंतर या टक्केवारीत आणखी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता ‘योगपर्यटना’ला बळकटी
योग, ध्यानधारणा आणि आयुर्वेदिक औषधोपचार यासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी नित्यनेमाने हजेरी लावणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे.
आणखी वाचा
First published on: 21-06-2015 at 12:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day yoga tourism