मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे बँकांकडून कर्ज घेऊन मोटरगाड्या खरेदी करून ती वाहने परराज्यात विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपी देशभरातील व्यापाऱ्यांची आर्थिक पत जाणून घ्यायचे. त्या आधारे व्यापाऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करण्यात येत असत. त्या कागदपत्रांच्या आधारे वाहन कर्ज घेऊन आरोपी गाड्यांची खरेदी आणि नंतर विक्री करत होते.
याप्रकरणी सात आरोपींना अटक केली असून त्या टोळीकडून पोलिसांनी १६ महागड्या मोटरगाड्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारीच्या किमती सात कोटी ३० लाख आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये तीन चोरीच्या असल्याची माहिती उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे यांनी दिली.
रविंद्र दिनानाथ गिरकर उर्फ परदिप रविंदर शर्मा (४७), मनिष सुभाष शर्मा(३९),सय्यद नावेद सय्यद जुल्फीकार अली (५२),दानिश रफिक खान (३२), साईनाथ व्यंकटेश गंजी (२९),यशकुमार सुनिल कुमार जैन (३३) आणि इमान अब्दुल वाहिद खान उर्फ देवा (३८) असे अटक आरोपींची नावे आहेत.