नव्याने करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
मंत्रालयाच्या पुनर्बांधणीच्या कामाला होणाऱ्या दिरंगाईबद्दल टीका होत असतानाच सहाव्या मजल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या दालनातील भिंतीलाच तीन ठिकाणी भेगा पडल्या आहेत. यामुळे कामाच्या दज्र्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर चार ते सहा मजल्यांच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांची दालने तयार करण्यात आली. यापैकी उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांची कार्यालये सुरू झाली. मुख्य सचिवांच्या दालनातील भिंतीला तीन ठिकाणी भेगा पडल्या आहेत. या भेगा किंवा तडे स्पष्टपणे दिसू लागल्याने ठेकेदाराने लांबी भरून डागडुजी केली असली तरी या भेगा अजूनही दिसत आहेत.
मुख्य सचिवांच्या आसनामागील भिंतीवरच या भेगा पडल्या आहेत. काम करताना हलक्या दर्जाचे साहित्य वापरल्याने किंवा प्लास्टर व्यवस्थित न झाल्यानेच बहुधा भिंतीला या भेगा पडल्या असाव्यात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ठेकेदाराकडून दुय्यम दर्जाचे काम करण्यात आल्यानेच हे काम भक्कम झाले नसावे. या संदर्भात मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांचे लक्ष वेधले असता त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
उपसचिवांना अखेर दालने
नव्या रचनेत फक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना दालने ठेवण्यात आल्याने अन्य अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. दालने नाहीत, ये-जा करायला पुरेशी जागा नाही, फाईली ठेवायला जागा नाहीत अशा विविध तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. वास्तविक काम सुरू झाले तेव्हाच याकडे लक्ष वेधण्यात आले होते. तेव्हा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने दुर्लक्ष केले. काम अंतिम टप्प्यात आल्यावर मात्र बदल करण्यात येत आहेत. उपसचिवांसाठी सहा फूट उंचीची दालने तयार करण्यात येणार असल्याचे मुख्य सचिव सहारिया यांनी सांगितले.