मनसेचे ‘टाळी’ला उत्तर
‘चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी साद काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेतून मनसेकडे जाणाऱ्या तरुणांना घातली होती. आता तीच परिस्थिती अजूनही कायम आहे. सेनेतील अनेक नाराज अजूनही ‘राज’मार्ग शोधतच असून, अशा पदाधिकाऱ्यांना संभ्रमावस्थेमध्ये ठेवण्यासाठीच ‘राज-उद्धव एकत्र येतील का, हा प्रश्न आम्हाला दोघांना एकत्र बसवून विचारा’ अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे ‘रोखठोक’ मत मनसेच्या एका ज्येष्ठ आमदाराने व्यक्त केले.
शिवसेनाप्रमुख हयात असताना एकत्र बसण्याची भूमिका का मांडली गेली नाही, त्यावेळी टाळीसाठी हात का पुढे आला नाही, असा मुद्दाही मनसेकडून उपस्थित करण्यात येत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत राज यांनी टाळी दिली म्हणूनच सेनेची सत्ता आली मात्र त्याची परतफेड नाशिक महापालिकेत मनसेला ‘हात’ दाखवूनच सेनेच्या चाणक्यांनी केली होती याकडेही या आमदाराने लक्ष वेधले.
शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव यांनी प्रथमच आपली राजकीय भूमिका शिवसेनेच्या मुखपत्रातून मांडली आहे. सेना-मनसे एकत्र येण्याचा मुद्दा, मराठी मतांचे विभाजन, दादरचा बालेकिल्ला सेनेच्या हातून का निसटला येथपासून मी खलनायक ठरतो इथपर्यंत अनेक मुद्दय़ांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. पण, ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्यामुळेच मी सेनेतील सर्व पदांचा त्याग करत आहे’ असे सांगूनच राज पक्षाबाहेर पडले होते. या परिस्थितीत काही बदल झाला आहे का, असा सवाल या आमदाराने केला. मराठी मते मनसेने फोडल्यामुळे काँग्रेसला फायदा झाल्याचा बराच आरोप यापूर्वी सेना नेत्यांनी केला आहे. पण दादरमध्ये मनसेलाच सर्व जागा मिळाल्याचे हे सोयीस्करपणे विसरतात. सेना मनसे एकत्र येण्याच्या मुद्दय़ावर टाळी एका हाताने वाजत नाही, असे उद्धव यांचे म्हणणे आहे. ठाणे महापालिकेत आम्ही टाळी दिली होती मात्र नाशिक महापालिका निवडणुकीत सेनेने टाळी देण्याचे का टाळले, असा सवालही या आमदाराने केला. आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर जाऊ पाहणाऱ्यांना संभ्रमावस्थेत टाकण्यासाठीच सेना-मनसे एकत्र येण्याबबतचा मुद्दा पुढे आणण्याची स्मार्ट खेळी खेळली जात आहे. आम्ही दोन पावले पुढे आलो राज यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही, हेही मराठी माणसावर ठसविण्याचा छुपा अजेंडा असल्याचे या आमदाराचे म्हणणे आहे.
उध्दव-राज यांनी एकत्र यावे- मुंडे
उध्दव-राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी राज्यातील मराठी जनतेची इच्छा असून त्यात भाजपला आनंदच आहे, असे सांगून त्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दर्शविली आहे. शिवसेना-भाजप युतीत मनसेने सहभागी व्हावे, अशी चर्चा गेली दीड-दोन वर्षे होत आहे. त्यामध्ये उध्दव ठाकरे हे प्रतिसाद देत नाही, असे चित्र प्रसिध्दीमाध्यमातून प्रसारित करण्यात आले. पण ‘सामना’ तील आपल्या मुलाखतीत उध्दव ठाकरे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत आणि एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभेवर भगवा फडकाविण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी शिवसेना-मनसेने एकत्र येण्याची गरज आहे, असे मुंडे म्हणाले.
सेनेतील ‘नाराजां’चा ‘राज’मार्ग रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मुलाखत प्रपंच !
‘चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी साद काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेतून मनसेकडे जाणाऱ्या तरुणांना घातली होती. आता तीच परिस्थिती अजूनही कायम आहे. सेनेतील अनेक नाराज अजूनही ‘राज’मार्ग शोधतच असून, अशा पदाधिकाऱ्यांना संभ्रमावस्थेमध्ये ठेवण्यासाठीच ‘राज-उद्धव एकत्र येतील का, हा प्रश्न आम्हाला दोघांना एकत्र बसवून विचारा’ अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे ‘रोखठोक’ मत मनसेच्या एका ज्येष्ठ आमदाराने व्यक्त केले.
First published on: 31-01-2013 at 05:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview funda of uddhav thackrey who are unhappy in shivsena