दीपक राजाध्यक्ष, आविष्कार संस्था
साचेबद्ध मनोरंजनाच्या सीमा मोडून समकालीन वास्तवावर भाष्य करत समाजाला आरसा दाखवण्याचे काम नाटकाने कायमच केले आहे. पण या कामाला ‘चळवळ’ म्हणून वाढीस लावले ते ‘आविष्कार’ने. काळासोबत बदलणाऱ्या विषयांना आणि सादरीकरणाच्या पद्धतीला हक्काचे व्यासपीठ देऊन प्रायोगिक रंगभूमी अधिक सशक्त करण्याचे काम या संस्थेत गेली पन्नास वर्षे सातत्याने सुरू आहे. यंदा करोनामुळे संकल्पनेतला सुवर्ण महोत्सव संस्थेला करता आला नाही. सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘आविष्कार’च्या सुवर्ण प्रवासावर आणि आगामी वाटचालीबाबत दीपक राजाध्यक्ष यांच्याशी संवाद..
‘आविष्कार’चा सुवर्णमहोत्सवी प्रवास कसा आहे?
‘रंगायन’मधून बाहेर पडून अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, विजय तेंडुलकर, अरुण काकडे यांनी नवा विचार देणारी ‘आविष्कार’ ही संस्था १९७१ ला सुरू केली. केवळ नाटय़निर्मिती हे आविष्कारचे उद्दिष्ट कधीच नव्हते. नाटक अविरत सुरू राहावे यासाठी रंगकर्मी तयार करण्याचे काम संस्थेने केले. एकूण प्रवासात अभिनय-दिग्दर्शनासोबत लेखन, नृत्य, गायन यालाही प्राधान्य देण्यात आले. ‘तुघलक’ हे ‘आविष्कार’चे पहिले नाटक. पुढे छबिलदासमध्ये आल्यानंतर ‘प्रतिमा’ नाटक बसवण्यात आले. ‘तुघलक’चे नेपथ्य दामू केंकरे, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गजांनी साकारले होते. ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांनी ‘तुघलक’च्या तालमींसाठी चार महिने सर्व चित्रपटांचे चित्रीकरण थांबवले होते. अशी जिद्द बाळगणाऱ्या दिग्गज मंडळींचा वारसा संस्थेला लाभला आहे. पुढे सरोजिनी वैद्य, अमोल पालेकर, नाना पाटेकर, नीलकांती पाटेकर, सतीश पुळेकर, सत्यदेव दुबे, जयदेव हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडी, स्वाती चिटणीस, सुषमा देशपांडे, प्रदीप मुळ्ये, शांतनील, शफाअत खान, चंद्रकांत कुलकर्णी, सयाजी शिंदे, राजीव नाईक, चेतन दातार, अजित भगत, विजय केंकरे, विश्वास सोहनी अशी अनेक मंडळी या चळवळीशी जोडली गेली. दोनशेहून अधिक कलाकृती आणि पाच हजारांहून अधिक प्रयोग आजवर संस्थेने केले आहेत. सत्तर आणि त्या पुढच्या दशकांमध्ये जाणवलेली सामाजिक, राजकीय, आर्थिक अस्वस्थता नाटकातून लोकांसमोर आणण्याचे काम ‘आविष्कार’ने केले आणि तीच ‘चळवळ’ आजही सुरू आहे.
‘चंद्रशाले’च्या माध्यमातून आविष्कारने बालरंगभूमीलाही स्थान दिले. त्याविषयी..
माधव आणि प्रेमा साखरदांडे हे दाम्पत्य व सुलभाताईंनी बालनाटय़ाला वाहून घेतले होते. मुलांसाठी या माणसांनी स्वत:ची कामे बाजूला सारून योगदान दिले. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला. ‘पंचतंत्र’, ‘दुर्गा झाली गौरी’ अशी अजरामर बालनाटय़े इथे झाली. ‘नाटक हे जर शालेय प्रवासातच मुलांच्या आयुष्यात आले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ते त्याच वयात त्यांना गांभीर्याने शिकवायला हवे’, ही ‘चंद्रशाले’ची भूमिका होती. आजच्या मुलांचे, त्यांच्या भाषेतील आणि भावविश्वातील नाटक समोर आणण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील.
कलाकारांची नवीन फळी निर्माण करण्यासाठी कोणत्या योजना आहेत?
तरुणांनी पुढे यावे यासाठी शफाअत खान, प्रदीप मुळ्ये, जयंत पवार यांना घेऊन ‘नाटककार’ कार्यशाळा घेण्यात आली. साधारण वर्षभर हा उपक्रम सुरू होता. जवळपास साठ संहिता या कार्यशाळेच्या माध्यमातून लिहिल्या गेल्या. त्यातून उत्कृष्ट सहा संहिता निवडल्या गेल्या, त्यापैकी तीन कलाकृतींवर काम सुरू आहे. तर उर्वरित नाटकांवरही पुढे काम करणार आहोत. करोना आटोक्यात येईल तसे तरुणांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या नवीन मुलांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व संहिता वाचनासाठी खुल्या केल्या आहेत. ‘तुम्ही वाचा, चिंतन करा आणि आजच्या जगण्याशी त्याचा काही संबंध येतोय का हे शोधा. त्यावर तुम्ही स्वत: लिहिते व्हा’ असा उप्रकम सुरू आहे.
खूप मोठा पल्ला आविष्कारने गाठला, आज या चळवळीकडे कसे पाहता?
‘जे काहीच कळत नाही, ते प्रायोगिक नाटक’ अशी आजवर प्रायोगिक नाटकाची बरीच थट्टा झाली आहे. पण ही थट्टा ‘आविष्कार’ने कधीच मोडून फेकली. सत्तरीनंतरचा काळ अस्वस्थ करणारा होता त्यातून तशा कलाकृती जन्माला आल्या आणि चळवळीने वेग घेतला. आजच्या काळातही अस्वस्थता आहेच पण जगणे सुखवस्तू झाल्याने त्याची तीव्रता जाणवत नाही. कर्जावर आज हवी ती गोष्ट मिळवता येत असली तरी पुढच्या काळाची अनिश्चितता मात्र मिटलेली नाही. त्यामुळे ‘चळवळ’ सुरूच राहणार आहे. आपण कसे जगतोय, का जगतोय आणि कुठे पोहोचतोय हे प्रश्न कायम असल्याने त्याची उत्तरे शोधण्याचे काम होत राहील आणि नवीन नाटके येत राहतील. नाटकाच्या प्रक्रियेत कार्यशाळेला महत्त्व आहे. ‘वाडा’, ‘ढोलताशे’, ‘बया दार उघड’, ‘चित्रगोष्टी’ ही अनेक नाटके कार्यशाळेतून घडली आहेत.
अरुण काकडे यांची कोणती शिकवण पुढे अविरत सुरू राहील?
जिथे जिथे नाटकवाला दिसेल आणि त्याला स्वत:चा मंच नसेल अशा प्रत्येकाला बोलावून त्याला हक्काचे रंगमंच देण्याचे काम काकांनी केले. पुढेही ते सुरू राहावे असे त्यांचे स्वप्न होते. काय नवीन करायचे आहे ते बिनधास्त करा, असे ते कायम सांगत. चळवळ ही एकटय़ाने नाही समूहाने यशस्वी होते आणि ती यशस्वी करण्यासाठी काकांनी खूप माणसे जोडली. नाटकाची आस असलेल्या प्रत्येकासाठी ‘आविष्कार’चा मंच उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय होते आणि पुढेही ते तसेच जपले जाईल.
‘आविष्कार’ला हक्काची जागा कधीपर्यंत मिळेल?
‘आविष्कार’ला हक्काचा रंगमंच मिळावा यासाठी काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत स्वत: यात लक्ष देत आहेत. राज्य सरकार आणि महापालिका दोघांकडूनही सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याने हक्काचा रंगमंच लवकरच मिळेल अशी खात्री वाटते.
सुवर्णमहोत्सवाचे काय नियोजन आहे?
करोनामुळे महोत्सव करता आला नाही तरी पुढच्या वर्षी हा महोत्सव होईल. आविष्कारच्या काही गाजलेल्या कलाकृती नव्या संचाकडून पुनरुज्जीवित केल्या जातील. काही नवीन कलाकृती लिहून घेतल्या जातील. वर्षभर चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यशाळा होतील. त्यामध्ये ‘लेखक-दिग्दर्शक’ एकत्र कार्यशाळा, तंत्रज्ञ, गीत- नृत्य- नाटय़, नेपथ्य, निर्मिती अशा बऱ्याच कार्यशाळा घेण्यात येतील.
मुलाखत- नीलेश अडसूळ