डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई प्राणी संग्रहालय, मुंबई
भायखळ्यातील ‘राणीची बाग’ म्हणजेच ‘वीरमाता जिजाबाई प्राणी संग्रहालय’ मुंबईतील पावणेपाचशे प्राण्या-पक्ष्यांना सामावून घेतलेले व दीडशे वर्षे जुने प्राणी संग्रहालय. सध्या येथे ‘हम्बोल्ट पेंग्विन’ हे शीत हवामान पसंत करणारे ‘काळ्या कोटातील’ पाहुणे आल्यापासून मुंबई शहराचे वातावरण मात्र तापू लागले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आलेल्या या पाहुण्यांच्या आगमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सत्ताधारी सेनेला मित्रपक्ष भाजपपासून अन्य पक्षांनी एकीकडे झोडपण्यास सुरुवात केली असून दुसरीकडे मुंबईतील प्राणिमित्र संघटना प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाला हे पेंग्विन पक्षी आणल्याबद्दल विरोध करत आहेत. त्यातच सेनेचे ‘युवराज’ आपल्या कच्च्याबच्च्यांसह पेंग्विन दर्शनाला येऊन गेल्याने प्राणी संग्रहालय व्यवस्थापन टीकेचे धनी होत आहे. या तिहेरी कात्रीत अडकलेल्या प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाची आलेल्या पेंग्विन पक्ष्यांबद्दल तसेच या संग्रहालयाच्या भविष्यात होणाऱ्या विस्तारीकरणाबद्दल एक ठोस भूमिका आहे. भविष्यात अनेक मोठे प्रकल्प येथे राबवले जाणार असून त्याची नांदी पेंग्विन पक्षी आणून पालिकेने केली आहे. या पेंग्विन पक्ष्यांना आणण्याचा नेमका उद्देश व पुढील प्रकल्प याबाबत ‘लोकसत्ता मुंबई’ने संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
’ पेंग्विन पक्षी आणण्याचा नेमका उद्देश काय?
प्राणी संग्रहालयाचा विकासाचा आराखडा २०१२ साली केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आला. त्या आराखडय़ातच पेंग्विन पक्ष्यांच्या मागणीचा उल्लेख होता. मुंबईत असे पेंग्विन आणल्यास ते तग धरू शकतील का? याची पाहणी केंद्र शासनाने केली. येथे या पक्ष्यांच्या वास्तव्याने त्यांना कोणताही धोका होणार नाही याची खात्री केल्यानंतरच केंद्र शासनाने आमची मागणी मंजूर केली. तसेच, आम्ही कोणत्याही शीत प्रदेशात जन्माला आणलेले पेंग्विन पक्षी संग्रहालयात आणलेले नाहीत. कोरियातील सेऊल येथील क्व्ॉक्स संग्रहालयात जन्माला आलेले हे पक्षी असून असे तीन हजारांहून अधिक पेंग्विन पक्षी १३० देशांमधील संग्रहालयात आहेत. भारतात असे पेंग्विन प्रथमच आले आहेत. त्याचा मान मुंबईला मिळाला आहे. पेंग्विन पक्ष्यांच्या जगभरातील जातींपैकी ‘हम्बोल्ट पेंग्विन’ ही महत्त्वाची आणि आकर्षक जात आहे. पर्यटकांना पेंग्विन पाहायचे असल्यास त्यांना पैसे खर्च करून परदेश गाठावा लागतो, पण मुंबईतच हे परदेशी पक्षी पाहता येणार आहेत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तसेच, प्राणी संग्रहालयाच्या विकासाची मोठी योजना असून असे अनेक प्राणी भविष्यात येणार आहेत.
’ मग प्राणिमित्र संघटनांच्या विरोधाला उत्तर का देत नाही?
उत्तर देण्यास तयार आहोत. मात्र, प्राणिमित्र संघटना अद्याप एकदाही आमची भेट घेण्यास व चर्चा करण्यास संग्रहालयात अथवा महानगरपालिकेत आलेल्या नाहीत. ते केवळ संग्रहालयाबाहेर येऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी विरोध करत आहेत. हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांच्या अधिवासातून त्यांना उचलून आणले, ते इथल्या वातावरणात जगणार नाहीत, असा खोटा प्रचार ही मंडळी करताना दिसतात. या पेंग्विन पक्ष्यांच्या आरोग्याला अतिशीत तापमानाची आवश्यकता नसून ते ४ ते २५ डीग्री सेल्सिअस तापमानात सहज वास्तव्य करतात. आपण त्यांना १२ ते १८ डीग्रीपर्यंतच्या तापमानात ठेवत आहोत. श्रीलंका, थायलंड या आशियाई देशांतदेखील हे पक्षी असून त्यांचे नैसर्गिक खाद्य हे आपल्या इथल्या अरबी समुद्रात सहज उपलब्ध होते. या पक्ष्यांना आणण्यापासून ते त्यांची काळजी घेण्यापर्यंतचा सगळा खर्च करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मात्र, ही पेंग्विन पक्ष्यांबाबतची वस्तुस्थिती आंदोलनकर्त्यांना बहुधा माहीत नसावी. ते आमच्याशी चर्चा करण्यास आले तर आम्ही त्यांना निश्चित समजावून सांगू. तसेच, हा प्रस्ताव काल-परवा मंजूर झाला नसून २०१२ सालीच झाला आहे. मग, आज पेंग्विन आणल्यावर यांनी विरोध का सुरू केला याबाबत आश्चर्य वाटते.
’ संग्रहालयातील अन्य प्राण्यांचे आरोग्य नीट राखत नसल्याचीही टीका होते?
ही टीका वस्तुस्थिती जाणून न घेता केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २००५ साली दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आमचा विकास आराखडा मंजूर करत नाही, तोपर्यंत एकही नवीन प्राणी आम्ही आणू शकत नाही. हा आराखडा २०१२ साली केंद्राने मंजूर केला. आता, या १६ वर्षांत आमच्याकडे वास्तव्याला असणाऱ्या प्राण्यांचे वय वाढू लागले. यात अनेकांचा नैसर्गिकरीत्या मृत्यूही झाला. त्यामुळे आमच्या इथल्या प्राण्यांचा मृत्युदर अधिक असल्याचे बोलले गेले. मात्र, नवीन प्राणी आले नाहीत आणि उपलब्ध प्राणी नैसर्गिकरीत्या वय वाढून मरू लागले अथवा आजारी पडले. आजारी पडलेल्यांवर तातडीने उपचार केले.
’ पेंग्विन व नवीन प्राण्यांच्या आरोग्यासाठी काय करणार?
येत्या काही वर्षांत प्राणी संग्रहालयाचा आवाका वाढणार असून प्राण्यांची संख्याही वाढणार आहे. मी स्वत: वन्यप्राण्यांच्या आजारावरील डॉक्टर असून आणखी दोन पशू वैद्यकीय अधिकारी आमच्याकडे आहेत. डॉक्टर, प्राण्यांचा सांभाळ करणारे, जैवशास्त्र अभ्यासक आदी मिळून ६० कर्मचारी आहेत. आता ही संख्या १५० होणार आहे. यात, संग्रहालयात असणाऱ्या व येऊ घालणाऱ्या प्राण्यांबाबतचे तज्ज्ञ, प्राण्यांची हाताळणी करणारे, सांभाळणारे व जीवशास्त्राचे अभ्यासक आदींचा समावेश असेल.
’ प्राणी संग्रहालयात काय बदल करणार आहात?
सध्याच्या प्राणी संग्रहालयाचा आम्ही येत्या २-३ वर्षांत संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहोत. पिंजऱ्यांची संख्या वाढवणार असून या पिंजऱ्यात जो प्राणी ठेवण्यात येईल, त्याच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच त्या पिंजऱ्याची निर्मिती करण्यात येईल. म्हणजे, वाघ असल्यास तो ज्या वनस्पती आरोग्यासाठी खातो त्या वनस्पती, पोहण्यास वेगळा तलाव, दडून बसण्यासाठी जागा असे रूप देण्यात येईल, जेणेकरून प्राण्याला ते जंगलातच आहेत, याचा भास होईल. हे पिंजरे सध्याच्या आकारपेक्षा दुप्पट मोठे असतील. तसेच, येणारे पर्यटक आता पिंजऱ्याबाहेर गर्दी करून उभे राहतात. मात्र, या पिंजऱ्यांबाहेर एक विशेष जागा करण्यात येईल, जेथून त्यांना प्राण्यांना व्यवस्थित पाहता येईल व प्राण्यांनाही त्रास होणार नाही. असे ७-८ मोठे पिंजरे बनवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, सध्या आमच्याकडे १३० प्राणी, ३०० पक्षी आणि ३५-४० सरपटणारे प्राणी आहेत. नव्याने तयार होणारे संग्रहालय आंतरराष्ट्रीय मानकांना धरून करण्यात येईल.