मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पारंपरिक, सरधोपट वाटेवरून न जाता नव्या विषयांवरील, वेगळय़ा धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित करणारे अनुराग कश्यप यांचा प्रवास ‘लोकसत्ता गप्पा’मधून जाणून घेता येणार आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशी चौफेर प्रतिभा असलेल्या अनुराग कश्यप यांच्या सिनेमाविषयक धारणा, त्यांचा व्यासंग, त्यांचा रोखठोकपणा आदी पैलू उलगडण्यासाठी दिग्दर्शक मकरंद देशपांडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
विविध क्षेत्रांतील दिग्गज प्रतिभावंतांशी ‘लोकसत्ता गप्पा’तून संवाद साधण्यात आला आहे. गप्पांच्या आगामी सत्रात, लेखणी आणि कॅमेऱ्यामागची तीक्ष्ण दृष्टी यांचा मेळ साधत धारदार कलाकृती सादर करणाऱ्या कश्यप यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असून तो केवळ निमंत्रितांसाठीच राखीव आहे.
एक तपाहून अधिक काळ लेखक-दिग्दर्शक म्हणून संघर्ष केल्यानंतर ‘देव डी’, ‘गुलाल’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रामन राघव २.०’सारखे वेगळे, बॉलीवूडची सरधोपट मांडणी नाकारणारे चित्रपट कश्यप यांनी दिले. निर्मात्याच्या भूमिकेतून इतर नवोदित, प्रयोगशील दिग्दर्शकांना पाठबळ देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळेही अनेक उत्तम हिंदी चित्रपट रसिकांना अनुभवता आले. चर्चा घडवणाऱ्या चित्रपटांबरोबरच रोखठोक, निर्भीडपणे भूमिका घेणारे दिग्दर्शक म्हणूनही कश्यप ओळखले जातात. कधी सेन्सॉरशिपविषयी तर कधी भवतालातील अराजकावर ते भाष्य करतात. प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय असे सर्व प्रकारचे चित्रपट पाहणारे, अभ्यासणारे आणि चित्रपटकर्मीशी मोकळेपणाने संवाद साधणारे कश्यप यांचा तारांकित प्रवास ‘लोकसत्ता गप्पा’तून जाणून घेता येणार आहे.
पथनाटय़ ते ‘ब्लॅक फ्रायडे’
अनुराग कश्यप यांच्या जीवनसंघर्षांची कथा चित्रपटात शोभून दिसावी इतकी रंगतदार आणि खाचखळग्यांनी भरलेली आहे. वैज्ञानिक बनण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या कश्यप यांची पथनाटय़ आणि हळूहळू रंगभूमीशी नाळ जुळली. पटकथा लेखनापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली; पण दिग्दर्शक म्हणून त्यांची दखल घेतली गेली ती २००७च्या ‘ब्लॅक फ्रायडे’ चित्रपटानंतर..
पॉवर्ड बाय : एम के घारे ज्वेलर्स
बँकिंग पार्टनर : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड