मुंबई : जासूस करमचंद, ‘जबान संभाल के’ मालिकेतील विविध भाषिकांना हिंदी शिकवण्याची धडपड करणारा प्राध्यापक मोहन भारती, ‘ऑफिस ऑफिस’ मालिकेतील मध्यवर्गीय मुसद्दीलाल ते विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकबूल’ चित्रपटातील जहाँगीर खान ऊर्फ अब्बाजी अशा कैक व्यक्तिरेखा गाजवणारे प्रतिभावंत अभिनेते पंकज कपूर यांच्याशी ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने संवादयोग जुळून आला आहे. गेली पाच दशके चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अमीट छाप उमटवणारे पंकज कपूर यांच्याशी शनिवारी, १ मार्च रोजी गप्पांची मैफल रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐंशीच्या दशकात ज्यावेळी समांतर चित्रपट हे मुख्य प्रवाहातील चित्रपटांइतकेच लोकप्रिय ठरले होते, त्या काळात पंकज कपूर यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘आरोहण’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे श्याम बेनेगल, कुंदन शाह, सईद अख्तर मिर्झा, मृणाल सेन अशा समांतर चित्रपटांचे अग्रणी समजल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करत वाटचाल केलेल्या पंकज कपूर यांच्या आयुष्यातील अनेक चढउतार, कडूगोड आठवणींचे संचित ‘लोकसत्ता गप्पां’मधून उलगडणार आहे.

ठोस भूमिका करण्याची संधी असेल तरच काम करेन, या भूमिकेतून सातत्याने नवे काही शोधत राहिलेल्या पंकज कपूर यांनी केवळ अभिनयापुरते स्वत:ला मर्यादित ठेवले नाही. त्यांनी लेखन, दिग्दर्शनही केले. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहनदास बी. एल. एल. बी.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज कपूर यांनी केले होते. २०११ मध्ये (पान १२ वर) (पान १ वरून) त्यांनी त्यांचा मुलगा अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर यांना घेऊन ‘मौसम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

अभिनेता म्हणून सर्जकतेच्या वाटा चोखाळत असताना आपल्या वाट्याला येणाऱ्या चित्रपटातील भूमिकांमध्ये एकसुरीपणा येतो आहे हे लक्षात आल्यानंतर त्या काळात घरोघरी लोकप्रिय झालेल्या दूरचित्रवाहिनी माध्यमाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. तिथेही विविधांगी मालिका केल्यानंतर पुन्हा एकदा ते विशाल भारद्वाजसारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आले. २००४ साली प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकबूल’ चित्रपटातील अब्बाजीच्या भूमिकेसह कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील ‘राख’ आणि ‘एक डॉक्टर की मौत’ या दोन चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या पंकज कपूर यांच्या प्रवासाविषयी जाणून घेण्याची संधी रसिकांना ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून मिळणार आहे.