मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे आरक्षण काही मिनिटांमध्येच संपले यामागे रेल्वेतील अधिकारी आणि दलाल यांचे लागेबांधे कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या प्रकाराची चौकशी रेल्वे मंत्रालयाने करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ा सोडल्या जातात. मात्र कोकणात जाणाऱ्या गाडय़ांसाठी १०० ते १२० दिवस अगोदर आरक्षण करावयास गेले तर आरक्षण संपल्याचे संदेश येतात. आरक्षण दोन ते तीन मिनिटांत संपते. हे कसे शक्य आहे, असा सवालही पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे.
काळय़ाबाजारात तिकीट विक्री करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जाते. यामागे रेल्वेतील अधिकारी आणि दलाल यांचे लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमताशिवाय असे प्रकार होणे शक्य नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने यामध्ये लक्ष घालून यात कोणाकोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी या पत्रात केली आहे.