मुंबई : फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय प्रयत्न केले, उद्योग विभागाने कोणत्या सवलती व अनुदान देऊ केले होते, उद्योगमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या आणि गुजरातमध्ये किती वेळा बोलाविले गेले, याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फॉक्सकॉनच्या मागणीनुसार सर्व सवलती व सोयीसुविधा मंजूर केल्या होत्या आणि सामंजस्य करारासाठी आमंत्रितही केले होते, असे स्पष्टीकरण शेलार यांनी केले.

भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ २०२० मध्ये १५ अब्ज डॉलर इतकी होती व ती २०२६ पर्यंत ६३ अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. चीन-तैवानमधील तणाव, करोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठय़ात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी हा प्रकल्प भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यावर विरजण टाकण्याचे काम शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांची सेना करीत आहे, असा आरोप शेलार यांनी केला.

वेदांत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आर्य हेब्बर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २६ जुलै २०२२ रोजी भेट घेऊन सादरीकरण केले आणि पुण्याजवळील तळेगाव येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, उद्योगस्नेही वातावरण, मुंबई व जेएनपीटी बंदरांशी संपर्क जोडणी, मजबूत मूल्य साखळी व अद्ययावत पायाभूत सुविधा अस्तित्वात असल्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये पुणे शहराला प्राधान्य दिले असल्याचे वेदांतच्या शिष्टमंडळाने सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ५ ऑगस्ट २०२२ रोजी समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांची भेट घेऊन त्यांना राज्यात गुंतवणूक करण्याबाबत पाठपुरावा केला. तर एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही ५ सप्टेंबर २०२२ रोजी पत्र पाठविले होते, असे शेलार यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने वाटामागितल्याने वेदांता फॉक्सकॉन गुजरातला -भांडारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळात वेदान्त-फॉक्सकॉनशी केलेल्या वाटाघाटीत आपला ‘वाटा’ मागितल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गुजरातला गेला व राज्याचे नुकसान झाल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केला. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असून त्यांनी कंपनीशी झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करावा आणि जनतेची माफी मागावी, अशी मागणी भांडारी यांनी केली.