मुंबई : गणेशोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) १५ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार झाल्याने मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले. या खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवानिमित्त कोकणातील गावी जाण्यासाठी मुंबईस्थित कोकणवासीयांची रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी लगबग सुरू असते. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या १२० दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. १८ मे रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात होता. मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर या खात्यावरून काढण्यात आलेली तिकिटे बाद करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कमी गर्दीच्या स्थानकातून तिकिटांचे आरक्षण

ऑनलाइन आणि तिकीट खिडकीवरून काढण्यात आलेल्या संशयास्पद तिकिटांची चौकशी सुरू आहे.  महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधील तिकीट खिडक्यांवरून ८६.८६ टक्के तिकिटे काढली आहेत. लहान स्थानकांतून तिकिटे काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

या संपूर्ण गैरप्रकाराची चौकशी सुरू असून, बनावट तिकीट आरक्षण खात्यांची सखोल तपासणी केली जात आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation 164 fake accounts in train ticket reservation for ganeshotsav ysh
Show comments