मुंबई : खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत असलेला तपासही थंडावला असून महापालिकेशी झालेल्या कंत्राटातील अटींमध्ये असलेल्या पळवाटा व गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत अद्याप ईडीला सापडला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ईडीही जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहार तपास लवकरच बंद करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वायकर यांना नुकताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेसह ईडीही तपास करत आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला होता. त्याप्रकरणी ईडीने वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले होते.

हेही वाचा >>>कारण राजकारण: आदित्य ठाकरेंसाठी वरळी यंदा कठीण?

तपास ठप्प

कथित गैरव्यवहारांमधून कमवलेल्या रकमेची कोठे गुंतवण्यात आली, याबाबत ईडी तपास करत आहे. पण या प्रकरणाचा ईडीचा तपास गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूखंडाबाबत २००४ मध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्या अंतर्गत ६७ टक्के जागा सार्वजनिक वापर व ३३ टक्के जागा विकास कामासाठी वापरण्याबाबत अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. हा ६७ टक्के भूखंड मनोरंजन व खेळासाठी निश्चित करण्यात आला होता. दरम्यान नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार भूखंडातील ७० टक्के भाग पुन्हा पालिकेला दिल्याचे दाखवून ३० टक्के जागेवर १४ मजली हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवण्यात आली, असा आरोप या प्रकरणात होता. पण करारामधील मनोरंजन या शब्दप्रयोगामुळे ईडीही या प्रकरणात कायदेशीर पेचात सापडली आहे. त्यामुळे या कथित आर्थिक गैरव्यहारातून कमवलेल्या रकमेचा माग ईडीला काढता आलेला नाही. परिणामी, या प्रकरणात गुन्ह्यांतील उत्पन्न (प्रोसिड्स ऑफ क्राईम) ईडी सापडलेले नाही.

मनोरंजनाच्या व्याख्येने कोंडी

●करारातील मनोरंजनाची नेमकी व्याख्या काय हे स्पष्ट नाही. तसेच गुन्ह्यांतील उत्पन्न सापडले नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला तपास बंदीचा अहवाल न्यायालयात मान्य होतो अथवा नाही, त्यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

●आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात वायकर व त्यांची पत्नी मनीषा यांना दिलासा देत या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अपुरी माहिती ही या प्रकरणाचा तपास बंद करण्याचे मुख्य कारण सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation closed by ed too failure to trace the source of income in the offenses against the vicar amy
Show comments