पायधुनी येथील एका प्रार्थनास्थळातील चोरीचा तपास अवघ्या २४ तासात करून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही चोरी करणारे गुन्हेगार हे प्रार्थनास्थळाची साफसफाई करणारे कर्मचारी असून त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पायधुनी येथील गोवा बिल्डींगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ‘जाफरी मैफिल’ हे प्रार्थनास्थळ आहे. २९ जानेवारीस ‘जाफरी मैफिल’च्या विश्वस्तांच्या वतीने सादिकअली कबरअली अल्लारखीया यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात चांदीचे ताजिया, जरी, पंजे, पाळणा तसेच अन्य चांदीच्या वस्तू अशा सुमारे ६२ लाख ३८ हजार ५०० रुपयांच्या वस्तू चोरीला तक्रार नोंदवली.
चोरीचा तपास करताना प्रार्थनास्थळातील कर्मचारी फातिमा अलताफ शेख आणि तिचा नवरा अलताफ हुसेन शेख या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. पोलीस निरीक्षक चव्हाण आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी फातिमाची अधिक चौकशी करण्यास सुरूवात करताच तिने अलताफ याच्यासमवेत चोरी केल्याचे आणि चोरीचा माल कुर्ला येथील साबळे नगर मधील पत्रा चाळीतील आपल्या घरी दडवल्याचे कबूल केले.
पोलिसांनी नवरा-बायकोस अटक केली व त्यांच्या घराची झडती घेतली असता तीन चांदीचे ताजिये, दोन पंजे आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ६० लाख नऊ हजार ५८ रुपयांचा मुद्देमाल सापडला. चांदीच्या वस्तूंची किंमत तीन लाख ८४ हजार रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अन्य कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहेत का याचा तपास सुरू आहे.