मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याविरोधात दाखल गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणातील पुढील तपास मुंबई पोलीस करणार आहेत. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. औरंगजेबाची स्तुती केल्याने हिंदूंच्या भावना दुखावणे, तसेच सत्ताधारी पक्ष मुस्लिम धर्मियांना बरबाद करत असल्याचे विधान करून हिंदू- मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९९, ३०२, ३५६ (१),३५६ (२) अर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आता मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हे अतिशय दुर्देवी आहे. अबू आझमी यांच्या विधानाचा निषेध करावा तेवढा कमी आहे. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाचे कौतुक करणे हे महापाप आहे”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यानंतर शिंदे गट आझमी यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे.

खासदार नरेश म्हस्के आणि शिंदे गटाचे पदाधिकारी सोमवारी रात्री उशीरा ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री हा गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीनुसार आमदार अबू आझमी यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या राज्य कारभारावर स्तुतीसुमने उधळली. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. औरंगजेबाच्या काळात देशाला ‘सोने की चिडीया’ बोलले जात होते. असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सत्ताधारांविषयीच्या एका प्रश्नावर आझमी यांनी उत्तर देताना हे लोक मुस्लिमांना बरबाद करत आहेत. या वक्तव्यामुळे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

औरंगजेबाने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले. धर्मपरिवर्तनासाठी जुलुम जबरदस्ती केली. देव धर्माची विटंबना करणाऱ्या औरंगजेबाचा कारभार भारतीय इतिहासाचा काळा अध्याय आहे. औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळून अबू आझमी यांनी हिंदूच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत नरेश म्हस्के यांनी तक्रार केली होती.

Story img Loader