मुंबई : बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून मोठय़ा प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे.
जिहादसाठी सबकुछ? हेच ब्रीदवाक्य या संघटनेने अप्रत्यक्षपणे बिंबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भविष्यात या संघटनेकडून दहशतवादी कारवायांची तयारी सुरू होती, या अंदाजास दहशतवादविरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. पीएफआय संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मजहर खान याच्याकडून एक पुस्तिका हस्तगत करण्यात आली. त्याचे शीर्षक होते २०४७. याचा अर्थ पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार होता याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ म्हणजे सिमी या संघटनेचा थेट दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
पीएफआयचे पद्धतशीररीत्या त्याच दिशेने काम सुरू होते, हे पुणे व काही प्रमाणात औरंगाबादमधील घटनांमधून स्पष्ट होत असल्याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. मुस्लीम युवकांना हेरून त्यांच्याप्रति सहानुभूती आणि मग जिहादची हाक दिली जात होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
सिमीवरील बंदीचा अभ्यास
सिमीवर बंदी आल्याच्या कारणांचाही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अडकले जाऊ नये याची काळजी घेतली जात होती. त्यामुळे ज्याप्रमाणे सिमीचे सदस्यत्व दिले जात होते तसे पीएफआयचे थेट सदस्यत्व न देता इतर आठ संघटनांमध्ये त्यांना विखुरले जात होते, असेही आता तपासात बाहेर आले आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबई युनिटने कुर्ला, कांदिवली व मालाड येथून अटक केलेले पीएफआयचे सदस्य हे अनुक्रमे कापड दुकानदार, साउंड टेक्निशिअन, वकील आहेत. मात्र हे सर्व पडद्याआड पीएफआयचे काम करीत होते. मुस्लीम युवकांना भडकविण्याचे काम करीत होते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. सिमीतही अशाच उच्चशिक्षित तरुणांचा भरणा होता. मात्र त्यांचा थेट बॉम्बस्फोटांशी संबंध होता. पीएफआयच्या माध्यमातूनही अशाच पद्धतीच्या कारवाया केल्या जाण्याची शक्यता होती. त्याआधीच त्यांच्या मुसक्या आवळल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.