चार दिवसांत घोषणा; बडय़ा गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती; विविध कंपन्यांशी ३२४ करार
‘मेक इन इंडिया’चे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्राने अनेक कंपन्यांशी यशस्वी बोलणी करीत सुमारे चार लाख ६० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचे लक्ष्य गाठले आहे. पुढील दोन-चार दिवसांमध्ये या करारांची घोषणा होणार असून एवढय़ा मोठय़ा गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत गुंतवणूक आकर्षित करण्यात चांगलीच आघाडी घेतली आहे. राज्य सरकार विविध कंपन्यांशी ३२४ सामंजस्य करार करीत असून ते सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचे आहेत. मेडामार्फत ३८ कंपन्यांशी सुमारे ५४ हजार कोटी रुपयांचे करार करण्यात येत आहेत. महानिर्मिती कंपनीकडून सुमारे दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी ६१ सामंजस्य करार करण्यात येतील. तर मेरिटाइम मंडळामार्फत सहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार होत आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्रात एम्बसी समूह ( तीन हजार कोटी रुपये), लोमा आयटी पार्क(अडीच हजार कोटी रुपये), रोमा बिल्डर्स(एक हजार ५० कोटी रुपये) यांच्याशी करार होत असून त्यातून सुमारे ९४ हजार रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात सीएट, एन्डय़ुरन्स, फोर्स, ह्य़ोसंग कॉर्पोरेशन यांच्याकडून गुंतवणूक होत आहे. अदानी ग्रीन एनर्जी (सात हजार कोटी रुपये), राजलक्ष्मी पॉवर (पाच हजार कोटी रु.), सीएमईसी चायना (१८ हजार कोटी रु.), टेलर पॉवर (१८ हजार कोटी रु.), सुझलॉन एनर्जी (१८ हजार ५०० कोटी रुपये), एफिशियंट सोलार एनर्जी प्रा. लि.(सहा हजार कोटी रु.) आदी ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या सामंजस्य करार करीत आहेत.

Story img Loader