डिझेलच्या दरवाढीमुळे एसटीला दिवसाला सुमारे एक कोटी ३२ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगोदरच अडचणीत असलेल्या एसटीचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी खासगी पंपावरून डिझेल भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता महामंडळाचे कर्मचारीच व्यक्त करू लागले आहेत.
गुरुवारपासून एस.टी.च्या आगार प्रमुखांनी खासगी पंपांवरून पेट्रोल भरण्यास सुरुवातही केली आहे. प्रायोगिक तत्वावर एक महिन्यासाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. आजमितीला एसटीच्या पंपावरून डिझेल भरले तर त्याचा दर ६४.११ रुपये प्रतिलिटर पडतो. तर खासगी पंपावर त्याचा भाव ५३.६९ रुपये असतो. त्यामुळे एसटी प्रशासनाने खासगी पंपावरून डिझेल भरण्याचा निर्णय घेतला आहे. तशी जबाबदारी आणि अधिकार आगार प्रमुखांना देण्यात आले आहेत. परंतु या प्रक्रियेत पंपमालक आणि आगारातील काही अधिकारांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार होऊ शकतो, असे एसटीतीलच वरीष्ठ आधिकारी खासगीत बोलताना मान्य करीत आहेत.
राज्यभरात एसटीला दिवसाला सुमारे १२ लाख लिटर डिझेल लागते. त्यामुळे जे पंपमालक आगार प्रमुखांना काही ‘विशेष सवलत’ देतील त्यांच्याकडेच डिझेल खरेदीचा व्यवहार होणार हे निश्चित आहे. त्यातच राज्यात सर्वत्र डिझेलचे भाव सारखे नसल्याने याठिकाणीही आर्थिक गैरव्यवहाराला वाव आहे. विशेष म्हणजे यासर्व शक्यतांवर महामंडळातील वरिष्ठ आधिकाऱ्यांमध्येही चर्चा झाली असल्याचे समजते. तरीदेखील हा निर्णय घेण्यात आला आहे.
बेस्टचीही खासगी पंपांवर धाव
राज्य परिवहन महामंडळापाठोपाठ आता बेस्ट उपक्रमानेही पुढील आठवडय़ापासून आपल्या बसगाडय़ांमध्ये खासगी पंपावर डिझेल भरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्टला प्रतिदिन अडीच लाख रुपये डिझेलवर खर्च करावा लागतो. दरवाढीनंतर प्रतिलिटर १२ रुपयांची वाढ झाल्याने डिझेल खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र खासगी पंपावरून डिझेल खरेदी केल्यास ते स्वस्त पडणार आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बेस्टचे उपमहाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.