मुंबई : देशात भाजपविरोधात एकत्र आलेल्या २७ पक्षांच्या ‘इंडिया’ महाआघाडीच्या मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. यजमानपद असलेल्या उद्धव ठाकरे गटाने २७ पक्षांच्या प्रमुखांना गुरुवारी निमंत्रणे पाठविली. आप पक्षाच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
काँग्रेस व आप दिल्लीत एकत्रच लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाआघाडीची पहिली बैठक पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने आयोजित केली होती, तर दुसरी बैठक काँग्रेसने बंगळूरु येथे आयोजित केली होती. मुंबईतील तिसऱ्या बैठकीचे यजमान पद या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राजदचे लालू प्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देण्यात आले आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. दिल्लीत काँग्रेस व आपमध्ये वाद सुरू असून आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वादावर तोडगा काढला जाणार आहे, असे राऊत यांनी नमूद केले.