गोव्याहून ताब्यात घेण्यात आलेला बुकी परेश भाटिया याला रविवारी सुटीकालिन न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू दारासिंग आणि चेन्नई सुपर किंगचा मालक गुरुनाथ मय्यपन याच्यासमवेत भाटियाची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, चेन्नई येथील पंचतारांकित हॉटेलचा मालक विक्रम अग्रवाल उर्फ व्हिक्टर हा पंटर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तूर्तास त्याच्या अटकेची शक्यता नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. व्हिक्टरचा मोबाइल क्रमांक गुरुनाथ मय्यपनच्या प्रिंटआऊटमध्ये मिळाल्यानंतर व्हिक्टरच्या प्रिंट आऊटमध्ये बुकी ज्युपिटरचे मोबाइल क्रमांक मिळाल्यामुळे त्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ज्युपिटरच्या चौकशीनंतरच व्हिक्टरचा सहभाग स्पष्ट होणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
कोण आहे हा टिंकू मंडी?
टिंकू मंडी याचे खरे नाव अश्विन अग्रवाल. पूर्वी टिंकू दिल्ली येथील मंडी नावाच्या सट्टेबाजाकडे काम करीत होता. नंतर त्याने स्वत: सट्टा लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वत:चे नाव त्याने टिंकू मंडी असे ठेवले. अल्पावधीतच तो मोठा सट्टेबाज बनला. फरारी सट्टेबाज शोभम मेहताही याच टिंकू मंडीच्या मार्फत सट्टा लावत होता, असेही स्पष्ट झाले आहे. फरारी सट्टेबाज ज्युपिटर आणि टिंकूने गुरगाव येथे एक भूखंड भाडय़ाने घेतला होता. ज्युपिटरच्या चौकशीनंतर सट्टेबाजांच्या आणखी काही बाबींवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.