भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा अटकेत असलेला जावई गुरुनाथ मयप्पन याच्या पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आलीये. मुंबईतील महानगरदंडाधिकाऱयांनी मयप्पनच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
गुरुनाथ मयप्पनला २४ मे रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. २५ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी सकाळी मयप्पनला महानगरदंडाधिकाऱयांकडे हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलांनी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. मयप्पनने सट्टेबाजीसाठी आपल्या नोकराच्या मोबाईलचा वापर केला होता. त्याचा तपास करायचा आहे. मयप्पन आणि विंदू दारा सिंगने परस्परांमधील संवादावेळी सांकेतिक भाषेचा वापर केला होता. त्याचा नेमका अर्थ काय, हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचे असल्याने त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
मयप्पनच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला. पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेल्या कागदपत्रांवरून मयप्पन याने फसवणूक केल्याचे कोठेही दिसत नाही. तसेच त्याने सट्टेबाजी केल्याचे पुरावे पोलिसांकडे नाहीत, त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करू नये, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने मयप्पनच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा