मुंबईः फेअर प्ले या बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दोघांना अटक केली. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या बेकायदा प्रक्षेपणाप्रकरणी ईडी तपास करत आहे. तसेच आयपीएल प्रसारणसह फेअर प्ले ॲपद्वारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे.
चिराग शहा व चिंतन शहा अशी अटक आरोपीची नावे आहेत. आरोपीं फेअर प्ले बेटिंग ॲपचे टेक्निकल व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पहायचे. दोघेही याप्रकरणातील संशयीत मख्य आरोपी क्रीश शहा याच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने फेअर प्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार वायकॉम १८ नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.
वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. पण फेअर प्ले या ॲपवर सामान्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सुमारे ४० चित्रपट कलाकारांनी या ॲपची जाहिरात केली. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार वायकॉम १८ ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणाच्या आधारारावर ईडीनेही तपासाला सुरूवात केली होती.
फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संस्थांसोबत करार केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच भारतीय संस्थांनी, कंपन्यांनी फेअरप्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी त्याबाबत कोणतीही योग्य काळजी घेतली नाही.
फेअर प्लेने विविध बनावट कागदपत्राद्वारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांद्वारे निधी गोळा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच बनावट बँक खात्यातील रकमेटा वापर करून ऑनलाईन माध्यमाध्यमातून व्यवहार करण्यात आले. त्यासाठी औषध कंपन्यांच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. हा निधी हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील परदेशी बनावट कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ४०० हून अधिक बँक खात्यांचा वापर करण्यात आला. ईडीच्या तपासानुसार, मे बेफी फिनसर्व प्रा. लि. व मे. ट्रू फंड इनोव्हेशन इंडिया प्रा. लि. यांनी फेअरप्ले वापरकर्त्यांसाठी बेकायदेशीर पेआउट सेवा पुरवल्या. फेअर प्लेच्या वापरकर्त्यांकडून निधी गोळा करण्यात आला, तो बनावट बँक खाती आणि मध्यस्थी बँक खाती वापरून फेरफार आणि वितरीत करण्यात आला. त्यानंतर हा निधी मे ट्रू फंड इनोव्हेशन इंडिया प्रा. लि. आणि मे बेफी फिनसर्व प्रा. लिच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्याचा वापर फेअर प्ले वापरकर्त्यांना बेकायदेशीररित्या पेआउट्स देण्यासाठी करण्यात आला. या बेकायदेशीर सेवांसाठी, या कंपन्यांना कमिशन प्राप्त झाले, जे संचालकांनी स्वत:च्या आणि संबंधित व्यक्ती/संस्थांच्या नावाने स्थावर मालमत्ता खरेदीसाठी वापरले.