सट्टेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी दिल्लीतील बिल्डर आनंद सक्सेना यांची चौकशी केली. त्याची शनिवारीही चौकशी केली जाणार आहे. आयपीएल सामन्यांच्या मोसमात सक्सेना विंदू दारासिंग याच्याशी सतत संपर्कात होते. त्यामुळे त्यांचाही सट्टेबाजीशी संबंध आहे का, याची चौकशी करण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तूर्तास तरी त्यांचा सहभाग आढळला नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही वा अटकही केलेली नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
सट्टेबाजी आपल्याला सक्सेना यांनी शिकविली, असा दावा विंदूने चौकशीदरम्यान केला होता. त्यामुळे सक्सेना यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.
विंदूला आपण सट्टेबाजी शिकवावी, इतका तो काही लहान नाही. दोन दशकांपासून आपण त्याला ओळखतो. दिल्लीत एका कार्यक्रमात आपल्या मित्राने विंदूची ओळख करून दिली होती. पवन आणि संजय जयपूर याच्याशी सक्सेना यांनीच विंदूची ओळख करून दिली होती, असेही पोलिसांनी सांगितले.
सक्सेना यांचा सट्टेबाजीत थेट संबंध नसला तरी सट्टेबाजांची रोकड त्यांनी बांधकाम व्यवसायात गुंतविली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.