मुंबई : सध्या देशभर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे वारे वाहत असून मैदानांवर तुफान फटकेबाजी सुरू आहे. विविध संघांचे चाहते स्टेडियममध्ये मोठी गर्दी करीत आहेत. मात्र स्टेडियमचे तिकीट न मिळालेल्या चाहत्यांना आयपीएलचे सामने मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सध्या देशातील विविध शहरातील ‘पीव्हीआर आयनॉक्स’ चित्रपटगृहांमध्ये विकेंडला आयपीएलच्या सामन्यांचे स्क्रीनिंग सुरू आहे.
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्स, चैन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स दहाही संघांचे शनिवार आणि रविवार या विकेंडला होणाऱ्या सामन्यांचे लाईव्ह स्क्रीनिंग ‘पीव्हीआर आयनॉक्स’ चित्रपटगृहांमध्ये केले जात आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) समन्वय साधून पीव्हीआर आयनॉक्स भारतातील त्यांच्या अत्याधुनिक चित्रपटगृहांमध्ये आयपीएलचे सामने लाईव्ह दाखवत आहेत. शनिवार, २२ मार्च रोजी आयपीएलचा उदघाटन सोहळा आणि विकेंडचे सामने दाखवून आता शनिवार आणि रविवार या विकेंडला दुपारी ३.३० आणि सायकांळी ७.३० वाजता होणाऱ्या सामन्यांचे लाईव्ह स्क्रीनिंग केले जात आहे. हे सामने पाहण्यासाठी नाणेफेकीपासून म्हणजेच दुपारी ३ आणि सायंकाळी ७ वाजता प्रवेश दिला जात आहे. तसेच ‘प्लेऑफ’चेही सामने दाखविण्यात येणार आहेत.
या लाईव्ह स्क्रिनिंगचे तिकीट १९९ रुपयांपासून सुरू आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाना, पंजाब या राज्यांसह दक्षिण, पूर्व आणि मध्य भारतातील विविध राज्यातील ‘पीव्हीआर आयनॉक्स’ चित्रपटगृहांमध्ये आयपीएलच्या सामन्यांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. अधिक माहिती आणि तिकीट आरक्षित करण्यासंबंधित तपशील https://www.pvrcinemas.com/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. क्रिकेट विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर आयपीएल क्रिकेट सामन्यांचेही विकेंडला चित्रपटगृहात स्क्रीनिंग केले जात आहे.
क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि चेंडूगणिक काळजात होणारी धडधड असे उत्सुकतेने भरलेले उत्साहवर्धक वातावरण स्टेडियमप्रमाणे चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळत आहे. विविध संघांचे चाहते टी-शर्ट आणि टोपी घालून चित्रपटगृहात प्रवेश करीत आहेत. तसेच अनेकजण मित्रमंडळींच्या समूहासह हे सामने पाहण्यासाठी चित्रपटगृहात येत आहेत. पॉपकॉन, शीतपेये आणि इतर पदार्थांचाही आस्वाद घेतला जात आहे. तर खेळाडूंनी धावा, चौकार, षटकार मारल्यानंतर आणि बळी टिपल्यानंतर एकच जल्लोष होत आहे. टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीही केली जात आहे.