नवी मुंबई येथे झालेल्या आयपीएलच्या सामन्यांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाचे पैसे वसूल करण्यासाठी नीव मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. सुमारे साडे दहा कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी, थकीत जमीन महसूल आकारणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने त्यांनी ही रक्कम वसूल करावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
नेरूळ येथील डी. वाय. पाटील क्रीडांगणावर आयपीएलचे काही सामने २०१० आणि २०११ मध्ये खेळविण्यात आले होते. २०१० मध्ये सहा सामने तर २०११ मध्ये सात सामने खेळविण्यात आले. या सामन्यांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस संरक्षणापोटी १० कोटी ४८ लाख ७९ हजार १५ रुपये इतका खर्च झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आयपीएलचे सामने भरविणाऱ्या व्यवस्थापनाकडे नवी मुंबई पोलिसांनी वारंवार मागणी करूनही त्यांनी एकही पैसा दिला नसल्याचे डॉ. संतोष पाचलग यांना माहितीच्या अधिकारामध्ये मागविलेल्या माहितीमध्ये, पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आयपीएल प्रशासनाने फक्त एकदाच २०१० मधील सामन्याच्या संरक्षणाचा खर्च म्हणून ४७ लाख ५३ हजार रुपये भरले होते. मात्र त्यानंतर त्यांनी एकही पैसा दिला नसल्याचे सांगण्यात आले.
नवी मुंबई पोलिसांनी आयपीएलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. एस. शेट्टी यांना आठ पत्रे पाठवूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाइलाजाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही वसुली करण्याबाबत विनंती केली आहे. आयपीएल व्यवस्थापनाने मुंबई आणि नागपूर पोलिसांचेही २० कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ४९ अन्वये वसुली करण्याठी थकीत जमीन महसुली म्हणून आकारणी करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळेच नवी मुंबई पोलिसांचे पैसे वसूल करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे.