‘आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने मी अतिशय निराश झालो आहे. मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असतो तर असे काही घडूच दिले नसते. या संपूर्ण प्रकरणामुळे बीसीसीआयच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे,’ असे उद्गार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बुधवारी काढले. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर बुधवारी प्रथमच आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष पवार यांनी आपली भूमिका प्रकट केली.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी बीसीसीआयचे पदाधिकारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय मंडळींनीसुद्धा बुधवारी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. जावई गुरुनाथ मयप्पनची चौकशी सुरू असेपर्यंत श्रीनिवासन यांनी पदावरून पायउतार व्हावे, असे आवाहन आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी केले. तथापि, नैतिकतेच्या मुद्यावरून श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निवेदनाद्वारे मागणी केली. ‘‘जावई गुरुनाथ मयप्पन याच्या स्पॉट-फिक्सिंगमधील कथित सहभागाच्या आरोपांमुळे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास मी योग्य व्यक्ती नाही,’’ असेही पवार पुढे म्हणाले. श्रीनिवासन यांचे भवितव्य बीसीसीआयच्या हाती असल्याचेही यावेळी त्यांनी सूचित केले.
‘‘माझ्या कार्यकाळात मला सहकाऱ्यांची चांगली साथ लाभली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझ्या कार्यकाळात काही चांगल्या गोष्टी घडून आल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएलच्या सहाव्या हंगामातील सर्व सामन्यांची गृहमंत्रालयातर्फे चौकशी व्हावी, ही शशांक मनोहर यांची मागणी योग्य आहे,’’ असेही पवार यावेळी म्हणाले. ‘आमचा लाचलुचपत विरोधी विभाग हे काम करेल, अशी जर बीसीसीआयची धारणा असेल, तर या चुकीच्या गोष्टींसंदर्भात ते गंभीर नाहीत, अशी माझी भावना आहे,’’ असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणमुळे क्रिकेटरसिकांच्या भावनांना तडा गेला आहे.’    
श्रीनिवासन ठाम
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाचा फास जसजसा आवळला जात आहे, तशीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. पण राजीनाम्याच्या मागण्यांचा समाचार घेत श्रीनिवासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा बुधवारीही स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा