होमगार्डचे पोलीस महासंचालक अहमद जावेद यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना बढती मिळाली असून, त्यांची होमगार्डच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर लगेचच अहमद जावेद यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळला. राकेश मारिया यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली.
येत्या ३० सप्टेंबर रोजी राकेश मारिया यांचा कार्यकाळ संपतो आहे. मात्र, तत्पूर्वीच राकेश मारिया यांची बदली करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आहे.
याआधी मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीवेळीच अहमद जावेद यांचे नाव आयुक्तपदासाठी चर्चेत होते. परंतु, सेवेनुसार ज्येष्ठ असूनही त्यांच्याऐवजी राकेश मारिया यांची मुंबईच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यामुळे काही काळ वाद देखील निर्माण झाला होता. मुंबईचे पोलीस आय़ुक्तपद आतापर्यंत अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाच्या बरोबरीचे होते. मात्र, अहमद जावेद यांच्या नियुक्तीवरून गृह विभागाने मुंबईचे पोलीस आयुक्तपद पोलीस महासंचालक दर्जाचे केले आहे.
दरम्यान, बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास आणि राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदलीचा काहीही संबंध नसल्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले.

Story img Loader