गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रंजिक कुमार सहाय (५२) यांनी मलबार हिल येथील राहत्या घरात रविवारी जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. सहाय यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असून ते ६० टक्के भाजले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.
१९८६ च्या बॅचचे आयपीएएस असलेले सहाय हे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात दोनच महिन्यांपूर्वी अतिरिक्त महासंचालक पदावर बढती मिळून आले होते. सहाय हे कुटुंबियांसह मलबार हिल येथील ‘अंबर अवंती’ या सरकारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. रात्री एकच्या सुमारास त्यांनी जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या वेळी पत्नी आणि दोन मुले घरात उपस्थित होते. सहाय यांना त्वरीत उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहाय यांचा जबाब नोंदविला गेलेला नाही. त्यामुळे नेमके कारण सांगता येणार नाही, असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले. सहाय यांचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत. त्यामुळे घराचा पंचनामाही झालेला नाही, असेही ते म्हणाले. मलबार हिल पोलिसांना दुपारी साडेबारा वाजता या घटनेची माहिती रुग्णालयातून मिळाली. पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदविलेला नसून केवळ डायरीत नोंद केलेली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी रुग्णालयात जाऊन सहाय यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
कौटुंबिक कलह की दबाव?
रंजित सहाय अतिरिक्त महासंचालक पदावर येण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते. महामंडळाचे व्यवस्थापक संचालक दीपक कपूर यांच्या कथिक गैरव्यवहाराबाबत त्यांनी अहवाल सादर केला होता. त्या अहवालानंतर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कपूर यांची चौकशी सुरू केली होती. कपूर हे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्यात सहाय नाखूष होते. कपूर आणि सहाय यांच्यात तेव्हापासून वाद होता.
कपूर हे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचे खासगी सचिव म्हणून पूर्वी कार्यरत होते. कपूर आणि सहाय यांच्यात वाद होता. त्यातून सहाय यांच्यावर काही दबाव होता का याचाही पोलीस शोध घेत आहेत. तसेच कौटुंबिक कलहातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले काय याचाही पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader