राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली. कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.
१९८८ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती. नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती. फिट राहण्यासाठी अत्यंत मेहनत रॉय घ्यायचे परंतु दुर्दैवानं त्यांना कर्करोगासारखा दुर्धर आजार झाला होता, आणि त्यांनी विमनस्क होऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
हिमांशू रॉय यांनी विविध महत्त्वाच्या गुन्ह्याच्या केसेसमध्ये तपास केला असून विशेषत: आयपीएलमधल्या बेटिंगप्रकरणी हायप्रोफाइल लोकांना अटक करण्यापासून याप्रकरणाचा तपास करण्यात रॉय यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. रॉय यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण पोलिस दलाला धक्का बसला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. या रोगातून ते हळूहळू बरेही होत होते. पण त्यांना या आजारामुळे नैराशाने घेरले. या नैराश्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असे समजते आहे. एक तडफदार आणि कर्तबगार पोलीस अधिकारी अशी इमेज असलेले हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
हिमांशू रॉय यांनी हाताळलेली महत्वाची प्रकरणे
१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे हिमांशू रॉय यांनी अनेक महत्वाच्या केसेस हाताळल्या होत्या. यामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा चालक आरिफवर झालेला गोळीबार, पत्रकार जे डे हत्या प्रकरण, विजय पालांडे यांचा सहभाग असलेलं दुहेरी हत्या प्रकरण, लैला खान हत्या प्रकरण, तसंच पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणाचा समावेश आहे.