मुंबई : खंडणीप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नेमणूक करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आले होते.
सत्तापालट झाल्यानंतर गेल्याच महिन्यात त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर गृह विभागाने सोमवारी त्रिपाठी यांच्या पदस्थापनेचे आदेश काढले आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली.
हेही वाचा >>> सामान्यांसाठी दोन लाख घरांची निर्मिती; म्हाडाचा संकल्प; सूचनांसाठी कार्यालयात पेटी
अंगडिया खंडणीप्रकरणी गेल्या वर्षी मार्चमध्ये पोलीस उपायुक्तपदी असलेल्या सौरभ त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्यात येते आहे, असे या समितीने निर्णय घेताना स्पष्ट केले होते. निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर त्यांना पद देण्यात आले नव्हते. गृह विभागाने त्रिपाठी यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून नेमणूक केली आहे.
हेही वाचा >>> बैठकीची सूत्रे शिवसेनेकडे, मसुद्याची जबाबदारी काँग्रेसवर, ‘इंडिया’ आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप झाल्यानंतर वर्षभरातच तत्कालीन उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात अंगडिया व्यावसायिकांनी प्रतिमहिना १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. अंगडिया व्यावसायिक संघटनेच्या सदस्यांनी ७ डिसेंबर, २०२१ रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेऊन त्रिपाठी यांच्याविरोधात तक्रार केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली. या चौकशीत अंगडिया व्यवसायिकांचे, आरोपी पोलिसांचे, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच विविध पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासण्यात आले. सावंत यांना प्राथमिक तपासात आरोपी पोलिसांविरोधात नऊ मुद्दे सापडले. याप्रकरणी तपासणी अहवाल पोलीस आयुक्तांना दाखवल्यानंतर त्यांच्या परवानगीने सावंत यांनी त्रिपाठींविरोधात स्वत: तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता पथकाकडे (सीआययू) वर्ग करण्यात आला होता.
प्रकरण काय?
‘अंगडिया’ खंडणीप्रकरणी गेल्या वर्षी मार्चमध्ये सौरभ त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्रिपाठी यांनी दरमहा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांनी केली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते.