एरवी मराठी अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आय.पी.एस. अधिकारी विधान भवनात एका उपनिरीक्षकाला झालेल्या मारहाणीनंतर एकत्र आले हे आश्चर्यच ठरले. पोलीस अधिकाऱ्यांनी नापसंती व्यक्त केल्यावर सरकारच्या पातळीवर कारवाईबाबत हालचाली सुरू झाल्या.
उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदारांकडून झालेल्या मारहाणीनंतर पोलीस दलात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. मुंबईचे आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तात्काळ विधान भवनात दाखल झाले. विधान भवन हे परिमंडळ-१च्या अखत्यारीत येते. पण विभागाचे उपायुक्त शिसवे हे गणवेशाऐवजी साध्या वेशात विधान भवनात धावपळ करताना दिसत होते. वास्तविक परिमंडळ-१ च्या अधिकाऱ्याने पोलीस गणवेशात येणे आवश्यक होते. काही वेळाने पोलीस महासंचालक संजीव दयाळ हेसुद्धा पोलिसांची नाराजी व्यक्त करण्यासाठी दाखल झाले. पोलीस दलात आयपीएस लॉबीकडून मराठी अधिकाऱ्यांची गळचेपी केली जाते, अशी नेहमीच तक्रार केली जाते. पण एका उपनिरीक्षकाला झालेल्या मारहाणीनंतर सारेच वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. आमदारांकडून झालेल्या मारहाणीमुळेच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली होती. या घटनेनंतर सारे पोलीस अधिकारी मारहाण झालेल्या उपनिरीक्षकाच्या मागे ठाम उभे राहिले. मारहाण करणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी या पोलीस अधिकाऱ्यांची मागणी होती.
मारहाण झाल्यावर सूर्यवंशी यांना तात्काळ विधान भवनाचे सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे यांच्या कार्यालयात नेण्यात आले. तेव्हा सूर्यवंशी हे चांगले बोलत होते. मारहाण झाल्यावर त्यांनी मोबाइलवर कोणाशी तरी संपर्कही साधला. बाहेर संतप्त आमदार जमले होते. परिस्थिती तणावपूर्ण होती. सूर्यवंशी यांना तशाच अवस्थेत बाहेर आणले असते तर आणखी गोंधळ होण्याची शक्यता होती. यामुळेच स्ट्रेचर आणून सूर्यवंशी यांना बाहेर काढण्यात आले.

Story img Loader