लखनभय्या चकमक प्रकरणात सरसकट १३ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर पोलीस दलात ‘धक्कादायक’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. चकमकीत सहभाग नसलेल्या पोलिसांनाही दोषी ठरविण्यात आल्यामुळे धैर्य खच्ची झाल्याचीही चर्चा पोलीस दलात सुरू आह़े  तरी एकही आयपीएस अधिकारी मात्र काहीही बोलायला तयार नसल्याचे आढळून येते. न्यायालयाच्या निकालापुढे काय बोलणार, अशीच भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
संघटित गुन्हेगारीविरोधात आघाडी उघडणारे मुंबई पोलीस आतापर्यंत चकमकीच्या प्रकरणात फारसे अडचणीत आले नव्हते. फेरीवाला असलेला जावेद फावडा याची चकमक अंगाशी आल्यानंतर उच्च न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले होते.
मात्र चकमकीचे कुठलेही प्रकरण पोलिसांच्या अंगाशी आले नव्हते. चकमकीच्या प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या काही याचिकाही फेटाळण्यात आल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढले होते. मात्र लखनभय्या चकमकीचे प्रकरण अंगाशी आल्यानंतर एकही गुंड चकमकीत ठार झाला नाही. सर्वच पोलिसांनी चकमकींपासून दूर राहण्याचे ठरविले.
लखनभय्या प्रकरण सुरुवातीपासूनच विविध बाबींमुळे चर्चेचा विषय बनले होते. ‘चकमक’फेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना या काळात बडतर्फ करण्यात आल्यानंतरही त्यांचे नाव या प्रकरणात घेतले जात होते.
हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयानेच विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर शर्मा यांच्यासह तब्बल २२ जणांना अटक करण्यात आली. त्यात १३ पोलिसांचा समावेश होता. या पोलिसांना काहीही होणार नाही वा काही पोलिसांना थोडीफार शिक्षा होईल, असे वाटत असताना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
खुनाच्या आरोपांमध्ये दोषी ठरलेले पोलीस
* तानाजी देसाई (हवालदार): खुनाचा कट रचणे, एखाद्याला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यास आणि त्याची हत्या करण्यास मदत करणे, बेकायदेशीररीत्या जमाव करणे, खून करण्यासोबतच पुरावा नष्ट करणे.
* प्रदीप सूर्यवंशी (वरिष्ठ निरीक्षक) आणि दिलीप पालांडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक): लखनभय्याच्या अपहरणाचा कट रचणे आणि त्यानुसार त्याचे अपहरण करणे, सरकारी नोकर असतानाही एखाद्याला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यास आणि त्याची हत्या करण्यास मदत करणे, बेकायदेशीररीत्या जमाव करणे, खून करण्यासोबतच पुरावा नष्ट करणे.
अपहरण, खून करण्यासह पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरलेले पोलीस
* रमाकांत कांबळे (हेड कॉन्स्टेबल) : सरकारी नोकर असतानाही लखनभय्या आणि या बनावट चकमकीचा महत्त्वाचा साक्षीदार अनिल भेडा यांचे अपहरण करणे, त्याच्या खुनासाठी मदत करणे, पुरावे नष्ट करण्याचा कट रचून त्यानुसार ते नष्ट करणे.
* विनायक शिंदे (पोलीस हवालदार) : सरकारी नोकर असतानाही लखनभय्या याचे अपहरण करण्यास मदत करणे, पुरावे नष्ट करण्यास मदत करणे.
* नितीन सरतापे (साहाय्यक पोलीस निरीक्षक), देवीदास सकपाळ, प्रकाश कदम, गणेश हरपुले (पोलीस उप निरीक्षक), आनंद पाताडे (पोलीस उप निरीक्षक), *पांडुरंग कोकम (पोलीस उप निरीक्षक), सुरेश शेट्टी (पोलीस अधिकारी) आणि अरविंद सरवणकर(पोलीस उप निरीक्षक) : सरकारी नोकर असतानाही लखनभय्याचे अपहरण करण्याच्या कटात सहभागी होणे, त्याचे अपहरण करण्यास मदत करणे, पुरावे नष्ट करण्यास मदत करणे.

Story img Loader