करोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली. ईडीने सुमारे चार तास चहल यांची चौकशी केली. चौकशीनंतर इक्बालसिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी कोविड काळात महापालिकेनं केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच करोना काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले, “मार्च २०२० मध्ये जेव्हा भारतात कोविडचा शिरकाव झाला. तेव्हा आपल्याकडे केवळ ३ हजार ७५० बेड होते. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाख असताना हे बेड फार कमी होते. त्या काळात मुंबईत करोना संसर्गाचे लाखो रुग्ण आढळतील, असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज पुढे खराही ठरला. मुंबईत ११ लाख कोविड रुग्ण आढळले.”
“त्या काळात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने मोकळ्या मैदानात जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बीएमसीने राज्य शासनाला निवेदन दिलं की, महापालिका करोना लढ्यात फार व्यग्र आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयाचं बांधकाम करू शकत नाही. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कोविड सेंटर बिगर सरकारी संस्थांनी बांधले. त्यामुळे हे कोविड सेंटर उभारण्यात बीएमसीला शून्य रुपये खर्च आला. मुंबईत असे एकूण दहा जम्बो कोविड सेंटर बांधण्यात आले. यातील एका जम्बो कोविड सेंटरबाबात मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली,” अशी प्रतिक्रिया चहल यांनी दिली.