रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना भाडेवाढ आणि रकमेत ‘पूर्णाक’ (राऊंड फिगर) करण्याच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार होत असतानाच आयआरसीटीसीनेही आपले भाव वाढवून प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी लांब पल्ल्याच्या प्रवासाचे तिकीट आयआरसीटीमधून काढताना प्रवाशांना जादा रक्कम द्यावी लागत आहे.
आयआरसीटीसीद्वारे तिकीट काढताना रोख रकमेचा वापर होत नाही. तिकीट काढताना प्रवाशाला आपल्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डाची माहिती किंवा बँक खात्याचा क्रमांक कळवायचा असतो. तिकीट काढल्यावर प्रवाशाच्या बँक खात्यातून थेट रक्कम वळती होत असते. त्यामुळे तिकिटाची रक्कम थेट बँक खात्यातून आयआरसीटीसीला मिळत असते. तिकिटाच्या रकमेवर आयआरसीटीसी आपला १० रुपये चार्ज आणि बँक शुल्क म्हणून १० रुपये किंवा तिकिटाच्या रकमेच्या किमान दोन टक्के रक्कम आकारण्यात येते. आता तसे होत नाही. तिकिटाची रक्कम अगोदरच रेल्वेने ‘राऊंड फिगर’ केलेली असताना आणखी त्यावर आयआरसीटीसी आपले शुल्क आणि रक्कम याचाही ‘राऊंड फिगर’ करीत आहे. त्यामुळे इंटरनेटवरून काढण्यात येत असलेल्या तिकिटात ‘राऊंड फिगर’ आणि बँक शुल्क साधारणपणे किमान चार ते पाच रुपये जास्त जात असल्याचे सांगण्यात येते.
आयआरसीटीसीच्या माध्यमातून देशात दररोज किमान साडेचार लाख तर दर महिन्याला १.३५ कोटी तिकिटे काढण्यात येतात. त्यामुळे फक्त ऑनलाइन आरक्षणामुळे आयआरसीटीसीला दरमहा साडेपाच कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होत आहे.

Story img Loader