१८ जानेवारी ते १७ जुलैदरम्यान ७०० फुटांवरून मुंबापुरीच्या दर्शनाची संधी
‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ (एमटीडीसी) या राज्य सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रमापाठोपाठच ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने(आयआरसीटीसी) आपली बंद पडलेली ‘हवाई यात्रा’ पुन्हा एकदा पर्यटकांकरिता उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या हवाई यात्रेचे दोन पर्याय पर्यटकांना उपलब्ध झाले आहेत.
आयआरसीटीसीने एप्रिल, २०१५मध्ये ही यात्रा सुरू केली होती. परंतु, अवघ्या दोन महिन्यांतच ती बंद झाली. दरम्यानच्या काळात म्हणजे जानेवारी, २०१६मध्ये ‘एमटीडीसी’ने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुंबईचे हवाई दर्शन घेण्याची सुविधा सुरू केली. तर आता आयआरसीटीसीनेही श्रीमंतांप्रमाणे सर्वसामान्यांनाही मुंबईचे हवाई दर्शन घेता यावे, यासाठी ही सेवा १८ जानेवारी ते १७ जुलै दरम्यान राबविण्याचे ठरविले आहे. या सेवेमुळे मुंबईकरांना ७०० फूट उंचावरून मुंबापुरीचे दर्शन घेता येणार आहे. हवाई यात्रेसाठी दक्षिण मुंबई व उपनगर असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. ही सेवा बुधवार सोडून इतर सर्व दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. याबाबतच्या नियम व अटी ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्याचे सांगण्यात आले.
२,९५५ रुपये शुल्क
१० मिनिटांच्या या ‘हवाई सफरी’साठी प्रवाशांकडून २,९५५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दक्षिण मुंबईच्या हवाई दर्शनात वांद्रे-वरळी सी लिंक, हाजी अली आणि जहू असा परिसर तर उपनगरातील मालाड, गोराई आणि वर्सोवा हा परिसर पाहता येणार आहे.

Story img Loader