मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) जैन समुदायाच्या पर्यटकांसाठी अनोखी योजना आखली आहे. आयआरसीटीसीने देशभरातील जैन मंदिरे, धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ही योजना तयार केली आहे. यासाठी भारत गौरव टुरिझम ही विशेष रेल्वेगाडी धावणार असून या विशेष रेल्वेगाडीतून ‘जैन यात्रा’ करता येईल. मुंबईतून ३१ मार्च रोजीपासून ८ रात्री आणि ९ दिवसांच्या प्रवासासाठी ही रेल्वेगाडी निघणार आहे.
आयआरसीटीसीने भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी विशेष पर्यटन ट्रेन योजना सुरू केली आहे.
आठ रात्री, नऊ दिवस यात्रा
‘जैन यात्रा’ टूर पॅकेज हे भारतीय रेल्वे, आयआरसीटीसीने भारत गौरव टुरिझम ट्रेनद्वारे चालवलेल्या प्रमुख आध्यात्मिक प्रवास योजनेपैकी एक आहे. ८ रात्री आणि ९ दिवसांचा एकूण ४,५०० किमी अंतराचा धार्मिक प्रवास पर्यटकांना करता येणार आहे. या प्रवासात जैन समुदायाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. ही ‘जैन यात्रा’ ३१ मार्च २०२५ रोजी वांद्रे टर्मिनसवरून सुरू होईल. या ट्रेनमध्ये वांद्रे टर्मिनस – बोरिवली, वापी, वलसाड, भेस्तान (सुरत), भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना रेल्वे स्थानकांवरून पर्यटकांना बसता येईल. आयआरसीटीसीच्या ‘जैन यात्रा’ या विशेष टूरमध्ये पावापुरी, कुंडलपूर, गुणियाजी, लछुअर, राजगीर, पारसनाथ, रुजुवालिका, समेद शिखरजी आणि त्यानंतर परतीचा मुंबईकडील प्रवास सुरू होईल.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’
आयआरसीटीसीने जैन यात्रेतील पर्यटकांसाठी त्यांच्या विशेष आणि पूर्णपणे तृतीय श्रेणी वातानुकूलित ट्रेनची व्यवस्था केली आहे. एलएचबी डबे असलेल्या ट्रेनमध्ये आधुनिक स्वयंपाकघर, उत्तम आसन व्यवस्था अशा सुविधा प्रदान केल्या आहेत. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असेल. तसेच या ट्रेनमध्ये एकूण ७५० पर्यटकांना सामावून घेता येईल.
आयआरसीटीसी टूर दरम्यान पर्यटकांना सुरक्षित आणि निरोगी प्रवास प्रदान करून सर्व आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात येणार आहेत. तसेच धर्मशाळा किंवा हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, चहा/कॉफी आणि रात्रीचे जेवण याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण जैन पद्धतीचे असणार आहे. तसेच पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी वातानुकूलित वाहनांची व्यवस्था असेल.
आयआरसीटीसीच्या या योजनेसाठी प्रतिव्यक्ती २४,९३० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ऑनलाइन आरक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती आयआरसीटीसीद्वारे देण्यात आली.