देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स संकेतस्थळांपैकी एक असलेल्या ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’चे(आयआरसीटीसी) http://www.irctc.co.in संकेतस्थळ हॅक झाल्याचे वृत्त रेल्वे प्रशासनाने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ हॅक करून सुमारे एक कोटी ग्राहकांची खासगी माहिती चोरीला गेल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. मात्र, ‘आयआरसीटी’चे माहिती संपर्क प्रमुख(पीआरओ) संदीप दत्त यांनी संकेतस्थळ हॅक झाल्याचे बातमीत तथ्य नसल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. याशिवाय, याप्रकरणी एक उच्चस्तरीय समिती नेमून प्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांची माहिती हॅक झाल्याच्या कथित प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती सायबर सेलकडे करण्यात आल्याचेही संदीप दत्त यांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या स्पष्टीकरणामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला आहे. हॅकर्सने ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ हॅक करून ग्राहकांच्या माहितीवर डल्ला मारल्याचे वृत्त झळकल्याने सर्वांना धक्का बसला होता. ‘आयआरसीटीसी’सारख्या सर्वात महत्त्वाच्या संकेतस्थळाबाबतीत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
रेल्वे तिकीट आरक्षणासाठी ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. दररोज या संकेतस्थळावर लाखोंचे व्यवहार होतात. तिकीट बुकींग करताना प्रवाशांना आपली वैयक्तीक माहिती द्यावी लागते. ही माहिती हॅकर्सने चोरल्याचे समजल्याने आपल्या माहितीचा गैरवापर होण्याची भीती प्रवाशांमध्ये पसरली होती.
‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर दररोज लाखो तिकीटे आरक्षित केली जातात. त्यासाठी प्रवाशांना लॉग इन करताना पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी महत्त्वपूर्ण वैयक्तीक माहिती पुरवावी लागते. दरम्यान, या माहितीचा दुरूपयोग होऊ नये म्हणून ती सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित संकेतस्थळाची असते.