बदलापूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना, वरून पडलेली सळई तरुणाच्या शरीराच्या आरपार गेली होती. या घटनेनंतर कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. घटना घडल्यावर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तरुणावर शस्त्रक्रिया पार पडली असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
बदलापूर मधील ठाणेकर पॅलेसिओ नावाच्या गृहप्रकल्पाचं काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या बाजूला एका मार्टचं काम सुरु आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी सत्यप्रकाश तिवारी हा २६ वर्षीय कर्मचारी शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास आला होता. तेव्हा ही घटना घडली.
हेही वाचा : मद्यधुंद कर्मचाऱ्यामुळे रेल्वे फाटक बंद ; वांगणीमध्ये सुमारे ३५ मिनिटे खोळंबा
याबाबत बदलापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल पडवळ यांनी सांगितलं की, “ठाणेकर पॅलेसिओ गृहप्रकल्प येथे ही घटना समोर आली आहे. सत्यप्रकाश तिवारी हा तरुण शेजारील मार्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम करत होता. तेव्हा ८ व्या मजल्यावरून सळई खाली पडली. त्यानंतर सत्यप्रकाश तिवारीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिवारीची प्रकृती सध्या स्थिर आहे.”
“याप्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पण, लवकरच आम्ही गुन्हा दाखल करून कारवाई करू,” अशी माहिती अनिल पडवळ यांनी दिली आहे.
हेही वाचा : मुंबई : दुचाकीवर धोकादायक साहसी कृत्ये करणाऱ्याला अटक
दरम्यान, ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यातून घुसून पाठीतून आरपार निघाली होती. या अपघातामुळे सत्यप्रकाश थेट जमिनीवर बसला. या घटनेमुळे गृहप्रकल्प येथे काम करत असलेल्या कामगारांत खळबळ उडाली होती. याप्रकरणावर ठाणेकर पॅलेसिओ गृहप्रकल्पाचे विकासक अजय ठाणेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.