शैलजा तिवले
गेल्या काही दिवसांत मुंबईत ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा साठाच न आल्याने शहरात या लशीच्या पुरवठ्यात अनियमितता आढळून आली असून बहुतांश केंद्रावर लस उपलब्धच नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिन घेऊ इच्छिणाऱ्यांना लस न घेताच माघारी जावे लागत आहे.
लशीच्या अनियमित पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे आता ४५ वर्षावरील सर्वांसाठी लस खुली केल्यानंतर असेच सुरू राहिले तर लसीकरण कसे करायचे अशी चिंता केंद्राना सतावत आहे.
शहरात सध्या काही छोटी लसीकरण केंद्र वगळता मोठ्या केंद्राकडे कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नाही. मुंबईला नुकताच २ लाख ३३ हजार ‘कोव्हिशिल्ड’च्या मात्रा राज्य सरकारकडून मिळाल्या. परंतु कोव्हॅक्सिनचा साठा मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राना ‘कोव्हिशिल्ड’ लसच द्यावी लागत आहे. मुंबईत कोव्हॅक्सिन आत्ताच सुरू केले असल्याने दुसरी मात्रा आता सुरू होणार आहे. परंतु दुसरी मात्रा सुरू झाल्यावर असा तुटवडा निर्माण झाल्यावर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
नोंदणीचा केंद्राना ताप
दोन्ही लशींच्या नोंदणीपासून टोचेपर्यत सर्व स्वतंत्र व्यवस्था केंद्राना करावी लागते. एखाद्या केंद्रात काही कक्षांवर एक लस आणि काही कक्षांवर दुसरी लस उपलब्ध असेल आणि त्यातील एका लशीचा साठा संपल्यास त्या कक्षांमध्ये दुसरी लस देण्यासाठी केंद्रांना अॅपमध्ये नवीन कक्षाची नोंदणी करावी लागते. यात बराच वेळ जातो. लशीच्या प्रकारानुसार लाभार्थ्यांसाठी पुरेशी लस आहे का याचा वारंवार आढावा घ्यावा लागतो. विशिष्ट लशींची मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांनाही समजावणे हे अतिरिक्त काम होऊन जाते. तेव्हा दोन्ही लशींचा साठा पुरेसा असल्यास अडचणी येणार नाहीत किंवा मग एका केंद्रावर एकाच प्रकारची लस उपलब्ध करणे योग्य राहील, असे मत लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
नियमित पुरवठा न झाल्यास…
मुंबईत लसीकरण केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून लसीकरणाची क्षमताही जवळपास ४० हजारापर्यंत गेली. ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले केल्यानंतर लशीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच याच दरम्यान ६० वर्षावरील ज्येष्ठांची दुसरी मात्राही सुरू होईल. आत्ताप्रमाणेच गरजेनुसार लस उपलब्ध न झाल्यास पुढे कसे होणार याची आम्हालाही काळजी लागली असल्याचे मत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कोव्हॅक्सिनचा साठा सुरुवातीपासूनच कमी असल्यामुळे पालिकेने मोजक्याच केंद्रावर ही लस उपलब्ध केली होती. या लशीच्या आत्तापर्यंत सुमारे १ लाख मात्रा आल्या होत्या. सध्या पुढचा साठा आलेला नसल्याने केंद्राना पुरवठा केलेला नाही. परंतु कोव्हिशिल्ड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
– सुरेश काकाणी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त
दोन दिवसांपूर्वी कोव्हॅक्सीनच्या २०० मात्रा होत्या. त्या आता संपल्या असून नवीन साठा आलेला नाही. आमच्याकडे दिवसाला दीड हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाते. मधल्या काळात कोव्हिशिल्डचा साठाही पुरेसा नसल्याने दररोज सुमारे दोन हजार मात्रा दिल्या जात होत्या. आता कोव्हिशिल्डचा साठा उपलब्ध आहे. परंतु कोव्हॅक्सीनची मागणीही अनेकजण करतात. दोन्ही लशी प्रभावी असल्याचे आम्ही सांगतो. काही जणांना कोव्हॅक्सिनच हवे असते, ते मग परत जातात.
– डॉ. प्रदीप आंग्रे, मुलुंड करोना केंद्राचे अधिष्ठाता
आमच्याकडे आत्तापर्यंत सहा हजार कोव्हॅक्सिनच्या मात्रा आल्या होत्या. मधल्या काळात पहिल्यांदा लस घेण्यासाठी आलेल्यांना कोव्हॅक्सिनच द्यावी, कोव्हिशिल्ड देऊ नये अशा सूचना राज्याकडून आल्या. त्यामुळे आम्ही कोव्हॅक्सिन द्यायला सुरुवात केली. त्यानंतर चार दिवसांत साठा संपल्यामुळे आता कोव्हिशिल्ड द्या, अशा सूचना आल्या. त्यामुळे आता पुन्हा कोव्हिशिल्ड देत आहोत. बीकेसीच्या केंद्रामध्ये आम्ही दरदिवशी सुमारे चार हजार जणांचे लसीकरण करतो. आमच्याकडे एकावेळी २० हजार मात्रा ठेवण्याची सुविधा आहे. पूर्वी चार ते पाच दिवसांचा साठा दिला जात होता. परंतु आता साठाच पुरेसा नसल्याने मधल्या काळात दररोज लस आणण्यासाठी गाड्या पाठविण्याची आमच्यावर वेळ आली होती. आता कोव्हिशिल्डचा साठा आहे. परंतु कोव्हॅक्सीन उपलब्ध नाही. त्यामुळे खास कोव्हॅक्सीन घ्यायला येणारे नागरिक परत जातात.
– डॉ. राजेश डेरे, बीकेसी करोना केंद्राचे अधिष्ठाता