पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पावसाच्या पहिल्याच तडाख्यात मुंबई जलमय झाली होती आता  रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली आहे. पालिका विभाग कार्यालयांतील रस्ते विभागातील अभियंत्यांना मिळालेले अपुरे प्रशिक्षण आणि केवळ संगणक प्रणालीवर उपलब्ध होणाऱ्या छायाचित्राच्या आधारे खड्डे बुजविण्याची कंत्राटदारांची मानसिकता यामुळे दिवसेंदिवस रस्ते खड्डय़ात जाऊ लागले आहेत. खड्डे बुजविण्याच्या कामात मोलाची मदत करणाऱ्या प्रोबिटी सॉफ्टवेअर कंपनीवरही प्रशासनाच्या अनास्थेमुळे कार्यादेशाशिवायच काम करण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे संगणक प्रणालीच्या मदतीने बुजविण्यासाठी पालिका प्रोबिटी सॉफ्टवेअर कंपनीच्या संगणक प्रणालीचा वापर करीत आहे. भ्रमणध्वनीवर काढलेली खड्डय़ांची छायाचित्रे संगणक प्रणालीवर उपलब्ध होताच ते ४८ तासांमध्ये बुजविण्याची सक्ती कंत्राटदारांना करण्यात आली आहे. प्रोबिटीबरोबर पालिकेने केलेल्या कराराची मुदत आता संपुष्टात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होताच पालिकेला त्याची आठवण झाली आणि पुन्हा धावतपळत पालिकेने या कंपनीबरोबर करार केला. मात्र अद्यापही या कंपनीला कार्यादेश देण्यात आलेले नाही.
मात्र मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी कार्यादेशाची वाट न पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या कंपनीने आपली सेवा कार्यान्वित केली आहे. पालिकेने अलिकडेच रस्ते विभागामध्ये कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली. खड्डय़ांचा शोध घेऊन त्याचे छायाचित्र संगणक प्रणालीवर उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. मात्र पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील या कनिष्ठ अभियंत्यांना भ्रमणध्वनीवर काढलेले खड्डय़ांचे छायाचित्र संगणक प्रणालीवर उपलब्ध करण्याचे प्रशिक्षण फक्त एक तास देण्यात आले. परिणामी अनेक अभियंत्यांना खड्डय़ाचे छायाचित्र काढल्यानंतर ते संगणक प्रणालीवर टाकताना अनेक अडचणी येत आहेत. परिणामी संगणक प्रणालीवर कमी खड्डय़ांची नोंद होत आहे.
कंत्राटदारही केवळ छायाचित्रात असलेले खड्डे बुजवित आहेत. त्यामुळे भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यात बंदिस्त न होणारे खड्डे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Story img Loader