मुंबई : एसटी मंडळाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गटाला सूचक इशारा दिला होता. यावरून शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एसटी मंडळाच्या अध्यक्षपदाचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक सरनाईक यांना उपयुक्त ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीस यांनी शिंदे यांच्या काळातील अनेक निर्णयांना कात्री लावली. एसटी महामंडळात नवीन बस खरेदी करण्याच्या निविदेला स्थगिती देण्यात आली होती. त्यातच एसटी महामंडळ शिंदे गटाकडे राहिल, अशी अपेक्षा होती. परंतु सरकारने परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. सरनाईक यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यांचा मंत्रिमंडळातील समावेशही फडणवीस यांच्यामुळेच झाल्याची तेव्हा चर्चा होती. त्यातच महामंडळाच्या अध्यक्षपदी सरनाईक यांची नियुक्ती झाल्याने जवळीकीला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या पदावर नियुक्त करून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष