महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोणावरही तो एकापक्षामध्ये कायम राहणार असा शिक्का नसतो. त्यामुळे कोणीही गृहित धरु नये असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे. भुसावळ येथे लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खडसे यांच्या विधानामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही बोलून दाखवल्या आहेत. समाजाला भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे असे ते म्हणाले. एकनाथ खडसे स्वत: लेवा पाटील समाजातून येतात. एकनाथ खडसे खरंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पण एमआयडीसी जमीन घोटाळयाच्या आरोपामुळे त्यांना २०१६ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
भुसावळमधील या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटीलही उपस्थित होते. उल्हास पाटील यांनी खडसेंना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले. आतापर्यंत भाजपामध्ये तुमच्यावर बराच अन्याय झाला आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा असे उल्हास पाटील म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आधीच खडसेंना काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे.
एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. आयुष्याच्या संघर्षात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. माझा पक्ष असो (भाजपा) किंवा पाटील यांचा (काँग्रेस) कोणीही कायमस्वरुपी एकाच पक्षात राहणार असा कोणावरही शिक्का मारलेला नसतो. कोणीही असा अंदाज लावू नये किंवा तसे गृहित धरु नये असे एकनाथ खडसे म्हणाले. अन्याया विरुद्ध लढले पाहिजे. त्यानंतरच त्यांना आपली ताकत लक्षात येईल. आपली संख्या जास्त आहे असे खडसे म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकमध्ये लेवा पाटील समाज मोठया संख्येने वास्तव्य करतो.